Join us  

"तुमच्या मंत्र्यांनी किती भ्रष्टाचार केला अन् किती पाठीशी घातलं, याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे"

By मुकेश चव्हाण | Published: January 30, 2021 4:24 PM

भाजपाची सत्ता आल्यापासून माझी जवळपास ६ आंदोलनं झाली, असं अण्णा हजारे यांनी सांगितले.

मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. अण्णा हजारे ३० जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री अण्णांची केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्यासह भाजप नेत्यांनी राळेगणसिध्दीत भेट घेतली. केंद्राने अण्णांच्या मागण्यांसदभार्त उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापना करुन त्यात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले. त्यानंतर, सोशल मीडियातून आणि काही नेत्यांकडूनही अण्णांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

शिवसेनेने देखील त्यांचं मुखपत्र असलेल्या सामनामधून अण्णा हजारे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. राळेगणात बसून भाजपच्या नेत्यांसोबत प्रस्ताव आणि चर्चेच्या फेऱ्या करुन काय उपयोग? अण्णांनी आधी उपोषण जाहीर केले आणि आता केंद्र सरकारच्या आस्वासनांवर विश्वास ठेवून ते स्थगित केले. हे सर्व ठीक पण शेती आणि शेतकरी उद्धवस्त करणाऱ्या कृषी कायद्यांबाबत त्यांची भूमिका काय? या कायद्यांविरोधात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अण्णांचा पाठिंबा आहे का? अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या, असं सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. 

भाजपा नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनांमुळे अण्णांचे समाधान झाले असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मूळ प्रश्न आहे तो सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत जे दमनचक्र सुरू आहे, कृषी कायद्यांची जी दहशत निर्माण झाली आहे त्याचा. या संदर्भात निर्णायक भूमिका अण्णा घेत आहेत त्या त्यादृष्टीनेच उपोषण करीत आहेत असे एख चित्र निर्माण झाले होते. मात्र, अण्णांनी उपोषण मागे घेतले आहे. त्यामुळे कृषी कायद्यांबाबत त्यांची नेमकी भूमिका काय हे तूर्त तरी अस्पष्टच आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे. शिवसेनेच्या या विधानावरुन अण्णा हजारे चांगलेच आक्रमक झाले आहे. 

तुमचे मंत्री कुणाच्या तरी घरी गेले हे विसरलात का?, असा सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना अण्णा हजारे म्हणाले की, भ्रष्टाचार केला, त्याला पाठीशी घातलं म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळी तुमचा मंत्री कुणाच्या तरी घरी गेला होता. समाज आणि देश या व्यतिरिक्त आमच्यासमोर भाजपा, शिवसेना, काँग्रेस कुणीच नाही. ज्या ज्या वेळेला आम्हाला दिसलं की हे समाजाला घातक आहे, अशं कृत्य होतं. त्यावेळी आम्ही आंदोलनं केली आहे. हे काही पहिलं आंदोलन नाही. तसेच तुमच्या मंत्र्यांनी किती भ्रष्टाचार केला आणि त्यांना तुम्ही कसं पाठिशी घातलं, याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे.

भाजपाची सत्ता आल्यापासून माझी जवळपास ६ आंदोलनं झाली, असं अण्णा हजारे यांनी सांगितले. तसेच हे सर्व सुरु असताना आजच अग्रलेख लिहण्याचं काय कारण होतं, हे माध्यमांनी त्यांना विचारा. त्यानंतर ते काय बोलतायं ते मला सांगा, मग मी सर्व बाहेर काढतो, असा दावा देखील अण्णा हजारे यांनी यावेळी केला आहे. 

दरम्यान, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अण्णा दोन वेळा दिल्लीत आले आणि त्यांनी जंगी आंदोलन केले. या आंदोलनाच्या मशालींवर तेल ओतण्याचे काम तेव्हा भाजप करीत होता, पण गेल्या सात वर्षांत मोदी राज्यात नोटाबंदीपासून लॉकडाऊनपर्यंत अनेक निर्णयांमुळे जनता बेजार झाली, पण अण्णांनी कूसही बदलली नाही असा आरोप होत राहिला. म्हणजे आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय? बाकी आता रामराज्य अवतरले आहे का?, असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला होता.

तसेच कृषी कायदे रद्द केले नाहीत तर आत्महत्या करण्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला. जिवात जीव असेपर्यंत आंदोलनातून बाहेर पडणार नाही, असे टिकैत व त्यांचे लाखो समर्थक सांगतात व सरकार पक्षाचे आमदार लाठ्या-काठ्या घेऊन आंदोलनस्थळी जाऊन दहशत माजवतात. या निर्णायक क्षणी अण्णांची गरज आहे. अण्णा यांनी उघडपणे भूमिका घेण्याची गरज आहे.९०-९५ वर्षांचे शेतकरी गाझियाबादच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत अशा वयोवृद्ध शेतकऱ्यांना नैतिक बळ देण्यासाठी आता अण्णांनी उभे राहायला हवे, असं आवाहनही शिवसेनेने अण्णा हजारे यांना केलं होतं.

फडणवीसांनी मानले आभार

लोकशाहीत चर्चेतूनच मार्ग निघत असतात आणि मा. अण्णा हजारेजी यांची लोकशाहीवर दृढ श्रद्धा आहे. अण्णांच्या विविध मागण्यांसंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री, नीती आयोग सदस्य आणि मा. अण्णा हजारे यांचे प्रतिनिधी अशी एक उच्चस्तरिय समिती गठीत करण्यात येत आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा उच्चस्तरिय समितीचे गठन होते आहे. यापूर्वी अण्णा हजारेजी यांनी केलेल्या मागण्या आणि त्या पूर्ण केल्यासंबंधीचा अहवालसुद्धा यावेळी त्यांना सादर केला. अण्णा हजारेंनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो, असे ट्विटही फडणवीस यांनी केले आहे. 

टॅग्स :अण्णा हजारेशिवसेनासंजय राऊतभाजपामहाराष्ट्र सरकार