Join us  

वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या अतुल भातखळकरांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 3:21 PM

BJP Atul Bhatkhalkar : भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत आज तीव्र आंदोलन करण्यात आले.

मुंबई - गलथान कारभारामुळे संपूर्ण राज्यातील वीज ग्राहकांना नाहक त्रास देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने वीज बिलांत सवलत देण्याच्या आपल्याच आश्वासनावरून घुमजाव केल्याच्या विरोधात मुंबई भाजपचे प्रभारी व कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत आज तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला व आमदार भातखळकर यांना अटक केली. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत रास्तारोको आंदोलन केले. तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी समता नगर पोलीस स्थानकाला घेराव सुद्धा घातला.

आंदोलनाच्या वेळी बोलताना आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, ‘वाढीव वीज बिलाच्या विरोधात जूनपासून भारतीय जनता पार्टीने सतत मागणी व संपूर्ण राज्यभर आंदोलन करून सुद्धा या सरकारला काहीही फरक पडत नसून, अदानींच्या खिशात असणारे हे ठाकरे सरकार  'लाँतो के भूत बाँतो सें नहीं मानते' असेच आहे. या सरकारचे डोके ठिकाण्यावर आणण्यासाठी व जनतेला न्याय देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून अधिक प्रखर आंदोलन करण्यात येणार असून जो पर्यंत वीज बिलात सवलत मिळणार नाही तोपर्यंत राज्य सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही', असा थेट इशाराच त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.

राज्यातील जनतेला वाढीव व भरमसाठ वीज बिलातून सवलत देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आपल्या बजेट मधून पाच हजार कोटी रुपये द्यावे व उर्जा मंत्र्यांनी केलेल्या आश्वासनाप्रमाणे ३०० युनिट पर्यंत वीज बिलात माफी द्यावी अशी आग्रही मागणी सुद्धा  भातखळकर यांनी या वेळी केली. या आंदोलनाच्या वेळी भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, भाजपा मुंबई चे सचिव विनोद शेलार, राणी द्विवेदी, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शिंदे, भाजपा कांदिवली पूर्व मंडळ अध्यक्ष आप्पा बेलवलकर, नगरसेवक शिवकुमार झा, दक्षा पटेल, सुनीता यादव, सुरेखा पाटील, संगीता शर्मा, यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते तसेच वाढीव वीज बिलामुळे त्रस्त असणाऱ्या शेकडो महिलांची उपस्थिती होती.

टॅग्स :अतुल भातखळकरमुंबईभाजपापोलिसवीज