मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आदराने घ्या, ते पंतप्रधान आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी झापले होते, या भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांच्या टिप्पणीवरून आज मुंबई महापालिकेच्या सभेत अजित पवार यांच्या निधनाबद्दल मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावावरील चर्चेला काही काळ वादाचे स्वरूप आले.
बन यांच्या वाक्यामुळे उद्धवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. उपमहापौर संजय घाडी यांनी हस्तक्षेप केल्याने पुढील चर्चा पार पडली. घाडी यांनी शोकप्रस्ताव मांडला होता. त्यावर सभागृहातील प्रमुख नेत्यांची भाषणे झाली.
त्यानंतर बन भाषणासाठी उभे राहिले. पंतप्रधानाचे नाव आदरपूर्वक घ्या, असे अजित पवार म्हणायचे, हा संदर्भदेत, काही जण मात्र पंतप्रधानांना 'अॅनाकोंडा' या शब्दात हिणवतात, असा उल्लेख त्यांनी थेट उद्धवसेनेचे नाव न घेता केला. त्यास विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे भाजप आणि उद्धवसेनेच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली.
पेडणेकर यांनी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. अखेर उपमहापौर घाडी यांनी, दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांना वाद न घालण्याचे आवाहन करत मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला आणि सभागृहातील शोक प्रस्तावावरील चर्चा पुढे सुरू राहिली.
अजित पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी पक्षाची आणि राज्याची हानी झाली आहे, असा शोकप्रस्ताव उपमहापौर यांनी मांडला होता. त्यावर बोलताना सभागृह नेते गणेश खणकर यांनी, दादांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे, अशी भावना व्यक्त केली, तर महापालिकेच्या पहिल्याच सभेत अजित पवार यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली अर्पित करावी लागत असल्याने वाईट वाटते, अशी खंत पेडणेकर यांनी व्यक्त केली.
स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी, दादांच्या मृत्यूने निर्माण झालेली पोकळी भरायला खूप वेळ लागेल, अशी भावना व्यक्त केली, तर शिंदेसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी अजित दादा यांच्या सारखा नेता पाहिला नाही, असे उद्गार काढले.
सईदा यांना अश्रू अनावर
राष्ट्रवादी (अजित पवार) च्या गटनेत्या डॉ. सईदा खान या दादांशी निगडित आठवणी सांगताना भावुक झाल्या, तर सकाळी लवकर उठून अधिकाऱ्यांसमवेत, जनतेसोबत बैठक घेणारे अजित दादा हे पहिलेच नेते होते, या शब्दात काँग्रेस पक्षाचे गटनेते अशरफ आजमी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
Web Summary : Mumbai civic body saw uproar during Ajit Pawar's condolence meet. BJP's remark referencing Pawar's respect for Modi ignited clash between BJP and Uddhav Sena corporators. Deputy Mayor intervened, calming the situation.
Web Summary : मुंबई मनपा में अजित पवार के शोक प्रस्ताव पर हंगामा हुआ। भाजपा की टिप्पणी से भाजपा और उद्धव सेना के पार्षदों में झड़प हो गई। उप महापौर ने हस्तक्षेप कर मामले को शांत किया।