Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या कामावर भाजपकडून आरोप; अमित साटम, शिंदे यांची पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 06:14 IST

प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर, ‘भ्रष्टाचार करायलाही अक्कल लागत नाही’ असा टोला भाजपने हाणला.

मुंबई : मुंबई महापालिकेतील आमच्या कारभारात लपवाछपवी नाही, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर भाजपने आता महापालिकेसंदर्भात भ्रष्टाचाराचे काही आरोप पत्रकार परिषद घेऊन केले आहेत. भाजपचे आ. अमित साटम, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हे आरोप केले. प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर, ‘भ्रष्टाचार करायलाही अक्कल लागत नाही’ असा टोला भाजपने हाणला. मुंबई महापालिकेत २५ वर्षांत तीन लाख कोटींचे घोटाळे झाले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्राप्तिकर खात्याने ताशेरे ओढलेल्या स्थायी समिती अध्यक्षांचा अभिमान बाळगला जात आहे. स्थायी समितीत बेकायदा प्रस्ताव मंजूर केले जात असताना ही लपवाछपवी नेमकी कशासाठी? भ्रष्टाचारासाठी की, मलिदा लाटण्यासाठी? असा सवाल त्यांनी केला.महापालिकेत २५ वर्षे सत्तेवर एकत्र असताना मांडीवर बसले होते. त्यावेळी भ्रष्टाचार दिसला नाही का? बुद्धीचा गंज उतरला तेव्हा जाग आली? नुसते बोलू नका पुरावे द्या, असे आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे अमित साटम यांना दिले आहे.हे आहेत आरोपकोरोना उपाययोजनांमध्ये तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला. कोविड सेेंटरची कामे नातेवाइक गँगला देण्यात आली. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या  प्रत्येक टॅबची अंदाजित रक्कम २० हजार रुपये असून टॅबचा दर्जा, किंमत, कंपनी याबाबतची कोणतीही माहिती सभागृहाला दिली नाही. २०१५ मध्ये खरेदी केलेल्या अनेक टॅबमध्ये त्रुटी आढळल्या. टॅबमध्ये शैक्षणिक अप्लिकेशनसाठी प्रति टॅब २ हजार खर्च केले जाणार आहेत, तर वाढीव वॉरंटीसाठी प्रति टॅब ४,४०० रुपये खर्च येणार आहे. या बाबी अनाकलनीय असून टॅब खरेदीसाठी तरतूद १० कोटी असताना ३८ कोटींची टॅब खरेदी कशी केली जाते? पावसाळी औषधांच्या खरेदीचा प्रस्ताव आठ महिन्यांपासून महापौर कार्यालयात प्रलंबित होता.  ही फाईल अचानक गहाळ कशी होऊ शकते. महापौरांच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य ४.१५ लाख मुंबईकरांना खासगी लॅबमध्ये आरोग्य तपासणी करावी लागली. त्याचा ६५ कोटींचा भुर्दंड नागरिकांना बसला आहे. खासगी लॅब मालक आणि महापौरांनी संगनमताने फाईल गायब तर केली नाही ना?

टॅग्स :उद्धव ठाकरे