खासदार गोपळ शेट्टी यांच्यासह भाजप कार्यकर्त्याना अटक; सुनील केदार यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 13:53 IST2021-12-28T13:53:02+5:302021-12-28T13:53:41+5:30
मंत्री सुनील केदार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

खासदार गोपळ शेट्टी यांच्यासह भाजप कार्यकर्त्याना अटक; सुनील केदार यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन
मुंबई: भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला परवानगी नाकारणाऱ्या क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्याबाहेर मंगळवारी दुपारी आंदोलन करणाऱ्या उत्तर मुंबईचे खासदार गोपळ शेट्टी यांच्या सह भाजपा कार्यकर्त्याना अटक केली. यावेळी मंत्री सुनील केदार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आंदोलकांना आझाद नगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा कांदिवली पूर्व येथे पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आज दि, २८ डिसेंबर दुपारपर्यंत कायदेशीर परवानगी द्यावी अन्यथा क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्या समोर धरणे आंदोलनाचा इशारा उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिला होता. लोकमतने या संदर्भात वृत्त दिले होते. मात्र मंत्री महोदयांनी पुतळ्याला परवानगी दिली नसल्याने अखेर त्यांच्या बंगल्या बाहेर आम्ही आंदोलन केल्याचे खासदार शेट्टी म्हणाले.