Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात साजरा झाला गुन्हेगाराचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 02:49 IST

भांडुपमधील प्रकार : अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी

मुंबई : भांडुपमध्ये वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्याचे आव्हान कायम असताना भांडुप पोलीस ठाण्यात गुंडाचा वाढदिवस साजरा केल्याच्या व्हिडीओने पोलिसांवर टीकेची झोड उठली. त्यामुळे भांडुपकरांमध्येही नाराजीचे वातावरण होते. या प्रकरणी संबंधित पोलिसांची खातेनिहाय चौकशी सुरू असल्याची माहिती भांडुप पोलिसांनी दिली.

गेल्या आठवड्यात सोनापूर येथील रहिवासी असलेल्या आयान खान उर्फ उल्ला या गुंडाचा वाढदिवस पोलीस ठाण्याच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत साजरा करण्यात आला. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना केक भरवताना, गळाभेट देत शुभेच्छा देतानाचे व्हिडीओ, फोटो उल्लानेच व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सला ठेवले. पुढे तेच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले; आणि पोलिसांवर टीका सुरू झाली. त्याच्याविरुद्ध खंडणी, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका प्रकरणात आरोपपत्रही दाखल झालेले नाही. उल्ला हा काही पोलिसांसाठी हप्ते गोळा करण्याचे काम करतो, अशी चर्चाही भांडुपमध्ये आहे.हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलिसांकड़ून संबंधित पोलिसांची अखेर खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे.बीट चौक्यांमध्येही वाढदिवस...यापूर्वी मिलिंद नगर, तुलशेत पाडा या बीट चौक्यांमध्येही खंडणीखोरांचे वाढदिवस साजरे झाले आहेत. त्यातही नुकतेच टेंभीपाडा परिसरात सचिन कुलकर्णी उर्फ चिंग्या या तरुणाच्या वाढदिवसाच्या पार्टीत भांडुप पोलीस ठाण्यातील काही अधिकारी, कर्मचारी नाचण्यात दंग होते, अशी माहिती स्थानिक रहिवाशांकडून मिळाली.

टॅग्स :पोलिसभांडुप पश्चिम