'पक्षी उद्यानामुळे मुंबईच्या वैभवामध्ये भर'; मुलुंडमध्ये विदेशी पक्षी उद्यानाचे भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:34 IST2025-12-15T12:33:43+5:302025-12-15T12:34:09+5:30
मुलुंडमध्ये होऊ घातलेले प्रकल्प हे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावतानाच मुलुंडचा कायापालट करणारे आहेत.

'पक्षी उद्यानामुळे मुंबईच्या वैभवामध्ये भर'; मुलुंडमध्ये विदेशी पक्षी उद्यानाचे भूमिपूजन
मुंबई : मुलुंडमध्ये होऊ घातलेले प्रकल्प हे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावतानाच मुलुंडचा कायापालट करणारे आहेत. त्यापैकी एक नवा मापदंड हा आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'विदेशी पक्षी उद्यानाचे माध्यमातून स्थापन होणार आहे. सर्व प्रकल्प पर्यावरणपूरक असून निसर्गाच्या हातात हात घालून जाणारे आहेत. या प्रकल्पाच्या निमित्ताने मुंबईचे वैभव कित्येक पटीने वाढण्यासाठी मदत होईल. मुलुंड येथील पक्षी उद्यान हे मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वणी ठरो, अशी ईच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुंबईच्या उपनगरीय भागात नागरिक आणि पर्यटकांसाठी, पर्यटनाचा नवा आणि आकर्षक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मुलुंड (पश्चिम) परिसरातील नाहूर येथे अत्याधुनिक 'विदेशी पक्षी उद्यान' उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या पक्षीगृहाचे भूमिपूजन रविवारी सायंकाळी झाले. त्यावेळी मुख्यमंत्री ऑनलाइन बोलत होते.
यावेळी पालिकेच्या श्रीमती मनसादेवी तुलसीराम अगरवाल सर्वसाधारण रुग्णालयामध्ये बांधलेल्या नवीन इमारतीचे लोकार्पणही करण्यात आले. उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे या सोहळ्याला संबोधित केले.
कचरा क्षेपणभूमीवर गोल्फ पार्क करण्याची अगरवाल रुग्णालय, विदेशी पक्षी उद्यान अशा वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे मुलुंडकरांचे राहणीमान उंचावण्यासाठी मदत होईल, असे शिंदे यांनी नमूद केले.
पर्यटनाला चालना
माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार म्हणाले, आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'विदेशी पक्षी उद्यानाच्या निर्मितीमुळे जगभरातील विविध प्रांतातील पक्षी, विविध प्रकारचे खाद्य, विभिन्न अधिवास अशी रचना याठिकाणी करण्यात येईल. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.
शहरवासीयांसाठी सुविधा
आमदार मिहीर कोटेचा यांनी गोल्फ क्लब, तयार सिमेंट काँक्रिटचे रस्ते, पेट्रोल पंप, अत्याधुनिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'विदेशी पक्षी उद्यान, तीन उद्यानाचे भूमिपूजन अशा विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली. नागरी सुविधा, पर्यटन तसेच मनोरंजन, विरंगुळा अशा सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी नमूद केले.