Bird Flu: पालघर जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव; एक किमी अंतरातील कोंबड्या-अंडी करणार नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 01:34 AM2021-02-24T01:34:47+5:302021-02-24T06:47:24+5:30

मृत कोंबड्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह

Bird Flu: Outbreak of Bird Flu in Palghar District | Bird Flu: पालघर जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव; एक किमी अंतरातील कोंबड्या-अंडी करणार नष्ट

Bird Flu: पालघर जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव; एक किमी अंतरातील कोंबड्या-अंडी करणार नष्ट

Next

हितेन नाईक

मुंबई : पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या सधन कुक्कुट विकास गट, पालघर येथील शासकीय पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्यांचा भोपाळ येथील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालघरच्या एक किलोमीटर अंतर्गत सर्व दुकानांतील कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग, जिल्हा उपायुक्त आणि पालघर जिल्हा परिषदेच्या सूर्या कॉलनीस्थित पशुसंवर्धन विभागाच्या सधन कुक्कुट विकास गट अंतर्गत असलेल्या पोल्ट्रीमधून मागच्या आठवड्यात काही कोंबड्या चोरीला गेल्याच्या घटनेची तक्रार पशुधन विभागाकडून पालघर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली.

 पालघर पोलिसांनी यासंदर्भात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केल्याचे पालघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी दशरथ पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या घटनेनंतर काही दिवसांनी कोंबड्या मरण्याचे सत्र सुरू होते. मागील तीन दिवसांत ४५ ते ५० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.
 

या मृत कोंबड्यांच्या अवशेषांची तपासणी पुण्याच्या रोग अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात येऊन पुढे २१ फेब्रुवारी रोजी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान येथे पाठविण्यात आले होते. या विभागाने पाठविलेल्या अहवालात मृत कोंबड्यांचा मृत्यू हा ‘बर्ड फ्लू’ने झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे या कोंबड्या चोरीची घटना आणि बर्ड फ्लूबाबत काही साधर्म्य आहे का? याचा तपास पोलीस घेत आहेत.

संसर्ग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित  

जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी प्राण्यांमधील संक्रमिक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पशुधन विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या अनुषंगाने पालघरच्या सूर्या कॉलनीमधील सधन कुक्कुट गटमधील पोल्ट्रीतील कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्यानंतर त्याचा फैलाव इतरत्र होण्याची शक्यता पाहता घटनास्थळापासून एक किलोमीटर क्षेत्र संसर्ग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
 

Web Title: Bird Flu: Outbreak of Bird Flu in Palghar District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.