‘बिपोरजॉय’ वादळ येणार पाऊस घेऊन! मात्र, मान्सून मुंबईत १६ जूनला पोहोचणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 06:25 IST2023-06-07T06:24:42+5:302023-06-07T06:25:34+5:30
लेटमार्क लागलेला मान्सून केरळमध्ये ८ तर मुंबईत १६ जूनच्या आसपास दाखल होईल, असा अंदाज आहे.

‘बिपोरजॉय’ वादळ येणार पाऊस घेऊन! मात्र, मान्सून मुंबईत १६ जूनला पोहोचणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उठलेल्या ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाचा मुंबईसह राज्याला फटका बसणार नसला तरी त्याचा विपरीत परिणाम म्हणून पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीवर ताशी ६० किमी वेगाने वारे वाहतील. ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली. या काळात मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहनही केले आहे. दुसरीकडे चक्रीवादळाचा फटका मान्सूनलाही बसला असून, लेटमार्क लागलेला मान्सून केरळमध्ये ८ तर मुंबईत १६ जूनच्या आसपास दाखल होईल, असा अंदाज आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, बुधवारी सकाळपर्यंत त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल. ‘बिपरजॉय’ असे नाव देण्यात आले असून, हे नाव बांगलादेशने दिले आहे.
८, ९ आणि १० जून रोजी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्याचा वेग ताशी ६० किमी राहील. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकची किनारपट्टी खवळलेली राहील. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये. - कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग.