देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 07:18 IST2025-05-22T07:17:13+5:302025-05-22T07:18:14+5:30

शहरात तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सध्या मुंबई महापालिकेकडे केवळ कांजूरमार्ग व देवनार असे दोनच डम्पिंग ग्राउंड आहेत. मुंबईमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या एकूण सुमारे साडे सहा हजार मेट्रिक टन कचऱ्यापैकी ६०० मेट्रिक टन कचरा देवनार डम्पिंग ग्राउंडवर तर सुमारे पाच हजार मेट्रिक टन कचरा कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर जातो. 

Biogas project at Deonar dumping ground in 2 years; State government approval; Production of 18 tons of biogas per day | देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती

देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती

मुंबई : देवनार येथील डम्पिंग ग्राउंडवर दोन वर्षात बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या अखत्यारीत देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने महानगर गॅस कंपनीला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या जागेवर कंपनीकडून एक हजार मेट्रिक टन कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. यासाठी तब्बल १८ एकर क्षेत्रफळाची १३२ कोटींची जमीन कंपनीला १४ लाख रुपयांत दिली जाणार आहे. तर, कंपनीच्या खर्चाने मोफत येथील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल.

शहरात तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सध्या मुंबई महापालिकेकडे केवळ कांजूरमार्ग व देवनार असे दोनच डम्पिंग ग्राउंड आहेत. मुंबईमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या एकूण सुमारे साडे सहा हजार मेट्रिक टन कचऱ्यापैकी ६०० मेट्रिक टन कचरा देवनार डम्पिंग ग्राउंडवर तर सुमारे पाच हजार मेट्रिक टन कचरा कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर जातो. 

देवनार डम्पिंग ग्राउंडच्या जमिनीपैकी ११० हेक्टर जमीन ही धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. त्याकरिता या जमिनीवरील जुना कचरा साफ करण्यात येणार आहे. तर, कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड संरक्षित वनक्षेत्र घोषित केल्यामुळे ही दोन्ही डम्पिंग ग्राउंड पालिकेच्या हातून जाणार आहेत. 

१००० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया 
मुंबई महापालिका व महानगर गॅस यांच्यात १००० मेट्रिक टन कचऱ्यापासून प्रतिदिन बायोगॅस प्रकल्पाबाबत जून २०२३ मध्ये सामंजस्य करार झाला होता. हा प्रकल्प दोन टप्प्यांत उभारण्यात येणार आहे. पाचशे मेट्रिक टन प्रतिदिन अशी या दोन्ही प्रकल्पांची प्रत्येकी क्षमता असेल. 
पहिल्या टप्प्याकरिता ३२,३७५ चौ.मी (८ एकर) एवढी जमीन व दुसऱ्या टप्प्यासाठी ४०,४६८ चौ. मी (१० एकर) जमीन २५ वर्षांसाठी दिली जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांची जमीन उपलब्ध असून, तिथे लगेचच काम सुरू होऊ शकणार आहे. दोन वर्षांत हा प्रकल्प उभारण्याचे लक्ष आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील जमिनीवरील जुना कचरा साफ करून दिली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

त्यामुळे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प कुठे उभारायचा, असा प्रश्न मुंबई महापालिकेपुढे होता. त्यातच आता देवनारच्या कचराभूमीपैकी एकूण १८ एकर जागा ही महानगर गॅस कंपनीला बायोगॅस प्रकल्पासाठी सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे. त्यामुळे रोजच्या सुमारे साडेसहा हजार मेट्रिक टन कचऱ्यापैकी एक हजार मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

कंपनीला मिळणारे वार्षिक उत्पन्न - ७३ कोटी ६५ लाख
भूभागाची एकूण किंमत १३२ कोटी ४२ लाख ६२ हजार ९७६ रुपये
२० वर्षांकरिता एकत्रित भुईभाडे - १४ लाख ५६ हजार रुपये
असा असेल प्रकल्प - टप्पा १- टप्पा २
क्षमता- ५०० मेट्रिक टन प्रतिदिन - ५०० मेट्रिक टन प्रतिदिन
क्षेत्रफळ- १०  एकर - भांडवली खर्च- ३०० कोटी- ३१५ कोटी
बायोगॅस निर्मिती- १८ टन प्रतिदिन

Web Title: Biogas project at Deonar dumping ground in 2 years; State government approval; Production of 18 tons of biogas per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.