मुंबई शहरात पार्किंगची समस्या आ वासून उभी आहे. वाहतूककोंडीही नित्याचीच आहे. त्यामुळे बाइकवरुन प्रवास करण्याकडे सर्वसामान्य मुंबईकरांचा कल वाढत आहे. मुंबईकरांनी एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत १ लाख ४२ हजार बाइकची खरेदी केली आहे. याच कालावधीत गेल्या वर्षी १ लाख २६ हजार वाहनांची खरेदी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
रोज कार्यालय ते घर, शाळा, महाविद्यालय, मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि घरातील छोटी-मोठी कामे करण्यासाठी बाइकवरुन प्रवास करण्याला प्राधान्य दिले जाते. कमी जागेतून आरामात निघता यावे आणि वाहतूककोंडीतूनही विनासायास बाहेर पडण्यासाठी बाइकही उपयुक्त ठरते.
त्यामुळे बाइकची खरेदी करण्यावर नागरिक भर देतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुंबईतील चारही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये बाइकच्या नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. चारचाकी वाहनांच्या नोंदणीतही वाढ झाली असली तरी ती केवळ १ टक्के एवढीच आहे.
या कारणासाठी दिली जाते बाइकला सर्वाधिक पसंतीबाइकची किंमत ६० हजारांपासून सुरू होत असल्याने सर्वसामान्यांना परवडणारी आहे. त्यामुळे दुचाकीच्या विक्रीत दिवसागणिक वाढ होत आहे. शहरात सुरू असलेली सुविधांची कामे, त्यासाठी खोदलेले रस्ते, घटलेल्या लेन यामुळे वाहतुकीची कोंडी होते. वाहतुकीच्या कोंडीतून दुचाकीवरुन प्रवास करणे सोयीचे असते.
शहरातील रस्त्यांवर धावताना ६१ टक्के दुचाकी१. सध्या मुंबईत नोंदणी असलेल्या एकूण ४९ लाख वाहनांपैकी ३० लाख म्हणजेच ६१ टक्के दुचाकी आहेत. २. ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरीवली या आरटीओंमध्ये दिवसाला सरासरी ७२१ वाहने रजिस्टर होतात. त्यापैकी ५०० ते ६०० ही दुचाकी असतात.
नियमांचं उल्लंघन करण्यात बाइकस्वार पुढेभरधाव वेगाने दुचाकी चालवणे, सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने ये-जा करणे, हेल्मेटचा वापर न करणे, छोट्या रस्त्यावरुनही इतर वाहनांना ओव्हरटेक करणे, असे सर्रास प्रकार दुचाकीस्वारांकडून घडतात. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार राज्यात सर्वाधिक अपघाती मृत्यू विनाहेल्मेट बाइक चालवण्याने होतात.