हौसेला ‘मोल’ मोठे, १० कोटींत ‘व्हीआयपी’!; ९ महिन्यांत ५ हजार ७७५ फॅन्सी नंबरची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 13:25 IST2025-10-19T13:25:33+5:302025-10-19T13:25:44+5:30
वाहन चालकांची चॉइस नंबरला पसंती, या माध्यमातून परिवहनच्या तिजोरीत ९ कोटी ६९ लाख ५३ हजारांचा महसूल जमा झाला.

हौसेला ‘मोल’ मोठे, १० कोटींत ‘व्हीआयपी’!; ९ महिन्यांत ५ हजार ७७५ फॅन्सी नंबरची विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अनेकांना कार किंवा दुचाकी असणे, हे केवळ ब्रँड किंवा मॉडेलबद्दल नाहीतर वैयक्तिक पसंती दर्शविणारा नोंदणी क्रमांक असतो. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामधून (आरटीओ) तो सशुल्क दिला जातो. अशा क्रमांकाच्या विक्रीतून जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुंबईतील वडाळा आरटीओमधून ५ हजार ७७५ फॅन्सी नंबरची विक्री झाली. या माध्यमातून परिवहनच्या तिजोरीत ९ कोटी ६९ लाख ५३ हजारांचा महसूल जमा झाला.
वाहनमालकांमध्ये विशेष नोंदणी क्रमांकांची मागणी वाढत आहे. यात जन्मतारीख, भाग्यवान अंक किंवा सहज ओळखता येणारे क्रमांक घेण्याकडे वाहनमालकांचा ओढा वाढला आहे. फॅन्सी नंबरबाबतचे हे वाढते आकर्षण राज्यातील आरटीओसाठी महसुलाचा एक महत्त्वाचा स्रोत ठरत असल्याचे पहायला मिळत आहे.
नंबर करा सुरक्षित
बरेच जण वाहन डीलरशिपला भेट देण्यापूर्वीच त्यांचा इच्छित क्रमांक सुरक्षित करण्यासाठी हाैसेखातर मोठी रक्कम देण्यास तयार असतात.
वाहतूक विभागाच्या नियमांनुसार, विशिष्ट क्रमांकात रस असलेल्या कोणालाही आरटीओने निर्धारित केलेल्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट द्यावा लागतो. एकदा स्वीकारल्यानंतर, तो क्रमांक केवळ अर्जदारासाठी राखीव ठेवला जातो. या क्रमांकाची वैधता सहा महिन्यांसाठी असते.
ऑनलाइन प्रक्रिया
फॅन्सी नंबर मिळवण्यासाठी परिवहन संकेतस्थळावर जाऊन मोबाइल आणि ई-मेलच्या मदतीने ओटीपी मिळवून रजिस्ट्रेशन करावे. उपलब्ध असलेल्या चॉईस क्रमांकांमधून आवडीचा क्रमांक निश्चित करा.
त्याचे पैसे ऑनलाइन भरा. एका क्रमांकासाठी अधिक अर्ज आल्यास त्यासाठी लिलावाची प्रक्रिया ऑफलाइन ठेवण्यात येत असून, त्या क्रमांकासाठी अधिकचे पैसे दिल्यास क्रमांकाची ऑफलाइन पावती मिळते.
‘हा’ क्रमांक ठरतोय महागडा
०००१ या क्रमांकासाठी मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक या शहरांमध्ये सहा लाख रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, या क्रमांकालादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जानेवारी ते सप्टेंबरचा महसूल
महिना वाहने महसूल
जानेवारी ६०६ ९७ लाख ३६०००
फेब्रुवारी ६१७ ८२ लाख २७०००
मार्च ६९० १ कोटी २५ लाख ३०००
एप्रिल ६९९ १ कोटी २७ लाख ११०००
मे ४७७ ९० लाख ५९०००
जून ३७७ ८५ लाख ८००००
जुलै ९४९ १ कोटी ५५ लाख ८०००
ऑगस्ट ५४९ ८६ लाख ७०००
सप्टेंबर ८११ १ कोटी २० लाख २२०००