Join us  

गुणरत्न सदावर्तेंना मोठा दिलासा! हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर; दिले सुटकेचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 4:29 PM

पुण्यात दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्यात गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टाने दिलासा दिला आहे.

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी अटकेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते यांना (Gunratna Sadavarte) मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलासा दिला आहे. सदावर्ते यांच्यावर राज्यातील विविध पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकानंतर दुसऱ्या ठिकाणचे पोलीस त्यांना संबंधित प्रकरणांसाठी ताब्यात घेत आहेत. 

सन २०२० मध्ये पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी चौकशीसाठी ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज केला आहे. मात्र, आता कोल्हापूर पोलीस सदावर्तेंना घेऊन ऑर्थर जेलमध्ये घेऊन येत आहेत. 

पुन्हा आवाजाचे नमुने घेण्याची गरज काय? 

गुणरत्न सदावर्तेंनीच मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते, याची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या आवाजाचे नमुने घेणे आवश्यक असल्याचे राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात सांगण्यात आले. मात्र, सातारा पोलिसांनी याच संदर्भात दाखल अन्य गुन्ह्यात सदावर्तेंच्या आवाजाचे नमुने घेतलेले असल्याने आता पुन्हा त्यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची गरज काय? अशी विचारणा उच्च न्यायालयाकडून करण्यात आली. 

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. सोलापुरात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. पहिल्यांदा साताऱ्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर राज्यात वेगवेगळ्या भागात सदावर्तेविरोधात गुन्हे झाले आहेत.  

टॅग्स :मुंबई हायकोर्टपुणे