big relief for mumbai cyclone nisarga moves towards north Maharashtra | Cyclone Nisarga: मोठा दिलासा! मुंबईला असलेला निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला; अलर्ट कायम

Cyclone Nisarga: मोठा दिलासा! मुंबईला असलेला निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला; अलर्ट कायम

मुंबई: निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईला असलेला धोका टळला असल्याची माहिती स्कायमेटनं दिली आहे. अलिबागच्या किनारपट्टीवर दुपारी एकच्या सुमारास धडकलेलं चक्रीवादळ सध्या ठाणे, पालघर पट्ट्यात आहे. इथून ते पुढे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे.  वादळ मुंबईच्या बाजूनं थोडं पुढे सरकलेलं असलं तरीही हवामान विभागानं दिलेला धोक्याचा इशारा कायम आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे असतील. 

अलिबागला धडकलेलं वादळ मुंबईला येण्याची शक्यता व्यक्त झाल्यानं शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज होती. दुपारी एक ते दीडच्या सुमारास अलिबागला धडकलेल्या धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबईलादेखील बसला. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरील कुलाबा येथील गीतानगर, वरळी कोळीवाडा, दादर, माहीम, जुहू आणि वर्सोवा परिसरात मोठया पावसाने हजेरी लावली. पाऊस धो धो कोसळत असतानाच वेगाने वाहणारे वारे देखील मुंबईकरांच्या मनस्तापात भर घालत होते. सकाळपासून सुरु असलेला पाऊस कोसळत असतानाच वादळ धडकण्याच्या म्हणजे दुपारच्या वेळी पावसाचा वेग ठिकठिकाणी वाढला. त्यामुळे मुंबईकरांना धडकीच भरली. 

निसर्ग चक्रीवादळामुळे सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर कायम होता. शिवाय सातत्याने वाहत असलेल्या वाऱ्याचा वेगही कायम होता. दुपारी पावसाचा आणि वाऱ्याचा वेग वाढू लागला असतानाच ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. मुंबई शहर आणि उपनगरातील समुद्र किनारी राहत असलेल्या, पश्चिम किनारपट्टीवरील, धोकादायक व समुद्र किना-यानजीकच्या वस्त्यांतील नागरिकांचे स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. महापालिकेतर्फे सुमारे ३५ शाळा आतापर्यंत नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी निश्चित करण्यात होत्या. आणि तेथे स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकदेखील येथे स्थलांतरित होत होते. अग्निशमन दल सज्ज होते. ६ चौपाटयांवर ९३ जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. रेस्क्यू बोट, जेट स्की आदी तैनात करण्यात आले होत्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या एकूण ८ तुकड्या, नौदलाच्या ५ तुकड्या मुंबईसाठी विविध ठिकाणी करण्यात आल्या होत्या. यामध्ये कुलाबा, वरळी, वांद्रे, अंधेरी, मालाड आणि बोरिवलीचा समावेश होता. 

याव्यतिरिक्त नियंत्रण कक्षात असलेल्या ५ हजारापेक्षा अधिक कॅमेऱ्यांद्वारे  घडामोडींवर नजर ठेवण्यात आली होती. पाणी साचण्याच्या संभाव्य ३०० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप उपलब्ध करण्यात आले होते. धोकादायक इमारतींची पाहणी करुन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. कोसळलेल्या झाडांना तातडीने हलविण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले होते. ९६ पथके तैनात करण्यात आली होती.  अतिसंवेदनशील ठिकाणी तसेच रुग्णालयांमध्ये वीजेसाठी जनित्र (जनरेटर) उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते.

२० ते २५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी व संभाव्य धोका असलेल्या मुंबईतील विविध भागांतून सुमारे २० ते २५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. तर सुमारे ३० हजार नागरिकांनी महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वत: स्थलांतर केले आहे. नागरिकांनी स्थलांतर करावे म्हणून जागोजागी आवाहन करण्यात येत आहे. स्थलांतरीत नागरिकांसाठी निवा-यासह  जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.  चक्रीवादळ ओसरल्यानंतर घरी परतण्यापूवी या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे देखील निर्देश देण्यात होते. दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांवरुन देखील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले होते.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: big relief for mumbai cyclone nisarga moves towards north Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.