लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उत्तर पश्चिम मतदारसंघाचे शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी करणारी उद्धव ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांची याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.
रवींद्र वायकर यांच्याकडून अवघ्या ४८ मतांनी पराभूत झालेल्या अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना मतांची पुनर्मोजणी करण्यासाठी अर्ज भरण्याची परवानगी दिली नसल्याचा आरोप केला. प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव होता आणि त्रुटीही होत्या, असा आरोप कीर्तिकरांनी याचिकेद्वारे केला होता.
न्या. संदीप मारणे यांच्या एकलपीठाने याचिका फेटाळली. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या क्षेत्रात वायकरांच्या कार्यकर्त्यांना मोबाइल फोन वापरू दिल्याचा आरोपही कीर्तिकरांनी केला. हरलेल्या व विजयी उमेदवारामध्ये कमी मतांचे अंतर असेल तर हरलेल्या उमेदवाराला पुन्हा मतमोजणीच्या मागणीचा अधिकार आहे. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी या तरतुदीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप कीर्तिकरांनी केला होता. वायकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले. कीर्तिकरांनी केलेल्या याचिकेत तथ्य नाही, असे वायकर यांनी न्यायालयाला सांगितले.