लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेने २५ जानेवारी रोजी मध्यरात्री सीएसएमटी-मशीद स्थानकादरम्यान कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ६ तासांचा ब्लॉक घेतला होता. मात्र, त्या काळात नियोजित काम पूर्ण झाले नाही. काम सुरू असताना एक मजूर जखमी झाल्याने काम थांबविले होते. त्यामुळे काम अर्धवट राहिले तसेच नंतरचे ब्लॉक रद्द केले. आज, बुधवारी मध्यरात्री १२.३० ते ३.३० या दरम्यान सीएसएमटी, मस्जिद या स्थानकांदरम्यान इमर्जन्सी ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉक काळात मुख्य मार्गावरील भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा कुर्ला, परळ, दादर आणि भायखळा स्थानकांवर थांबतील आणि सुटतील.
दरम्यान, हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्टेशनवर थांबतील आणि सुटतील.