Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉलिटेक्निक’मध्ये मोठे बदल; आता थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेशासह रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 06:30 IST

विद्यार्थ्यांना यंदापासून योग, व्यवसायाचे मिळणार धडे

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक शिक्षणात यंदापासून मोठे बदल केले असून योग, उद्योजकता, भारतीय ज्ञान प्रणाली व जीवन कौशल्य यांना अभ्यासक्रमात विशेष स्थान दिले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार अभ्यासक्रम अधिक कौशल्याधारित व उद्योगाभिमुख करण्यात येत आहे. पॉलिटेक्निक शिक्षणामुळे अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशासह रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सॉफ्ट स्किल्स, पर्यावरण, शाश्वतता आणि उद्योजकता यांसारख्या विषयांचा समावेश केला आहे. नव्या ‘के स्कीम’ अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार बदल केले आहेत. 

प्रशिक्षण कालावधी १२ आठवड्यांचा
विद्यार्थ्यांना इंग्रजीसोबत मराठीतूनही शिक्षण व परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. परिणाम केंद्रित क्रेडिट पद्धतीवर आधारित या अभ्यासक्रमात सहा सत्रे आणि १२० क्रेडिट्सचा समावेश आहे. औद्योगिक प्रशिक्षणाचा कालावधी सहा आठवड्यांवरून १२ आठवडे करण्यात आला असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवावर अधिक भर दिला जाणार आहे.

आयटीआय प्रवेशप्रक्रिया २१ मेपासून
राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ऑगस्ट २०२६ सत्राच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होत असून, २१ मेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.  गुरुवारी (दि. २१) सकाळी ११:०० वाजेपासून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. 
प्रवेश अर्जासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये, खुल्या प्रवर्गासाठी १५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये, तर अनिवासी भारतीय उमेदवारांसाठी ५०० रुपये अर्ज शुल्क असेल.  प्रवेशप्रक्रियेत १ जून २०२६पासून व्यवसाय अर्थात ट्रेड प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारांनी अधिकृत माहितीपुस्तिकेचा अभ्यास करूनच अर्ज भरावा, असे आवाहन  केले आहे. अर्ज निश्चितीनंतर प्राथमिक गुणवत्ता यादीपर्यंत माहितीमध्ये बदल करता येणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Polytechnic Overhaul: Direct Entry, Job Opportunities, Curriculum Changes Introduced

Web Summary : Polytechnic education in Maharashtra undergoes significant changes, emphasizing skills and entrepreneurship. The updated curriculum, aligned with NEP 2020, includes yoga and life skills. Direct entry to engineering's second year, along with enhanced industrial training, aims to boost employability. ITI admissions begin May 21st.
टॅग्स :शिक्षण