Join us  

"...म्हणून मी एकनाथ शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय घेतला; वडिलांना आधीच कल्पना दिलीय"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 7:48 PM

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

मुंबई: माजी मुख्यमंत्री ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. 

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भूषण देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  बाळासाहेब हेच माझे दैवत आहेत. महाराष्ट्राचा विकास आणि बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. मी त्यांचे काम पाहिले आहे. त्यांच्या कामाची पद्धतही माहीत आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला, असं भूषण देसाई यांनी म्हटलं आहे. तसेच या निर्णयाबाबत मी वडील सुभाष देसाई यांना माझ्या निर्णयाबद्दल आधीच कल्पना दिली होती, अशी माहिती देखील भूषण देसाई यांनी यावेळी दिली. 

सुभाष देसाई हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जातात. सुभाष देसाई हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते मुख्यनेत्यांपैकीही एक नेते आहेत. सुभाष देसाई हे सध्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.

भूषण देसाई यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही. ज्यांना कुणाला वॉशिंग मशीनमध्ये जायचं आहे त्यांनी जरूर जावं, अशी टीका माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्या ठाकरे यांनी केली आहे. सुभाष देसाई हे आमच्यासोबत आहेत. चोवीस तास ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतात. ते आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत. भूषण देसाई यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही त्यांना जिथे कुठे जायचं आहे त्यांनी जावं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेसुभाष देसाईशिवसेना