मुंबई: दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचा दहिसर ते काशीगाव हा मार्ग डिसेंबरअखेरपर्यंत सुरू करण्याचा 'एमएमआरडीए'चा प्रयत्न होता. मात्र, आता पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने 'सीएमआरएस' प्रमाणपत्र मिळाले तरी ही मेट्रो मार्गिका सुरू करण्यासाठी फेब्रुवारी उजाडणार आहे. त्यामुळे मीरा-भाईदरवासीयांना पहिल्या मेट्रोसाठी आणखी दीड ते दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मेट्रो ९ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावर सीएमआरएस पथकाकडून प्राथमिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या आठवड्यात या मेट्रो मार्गिकेवर अंतिम तपासणीसाठी कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) येणे अपेक्षित आहे. यापूर्वीच्या नियोजनानुसार या महिन्याच्या अखेरीस ही मेट्रो प्रवासी सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न होता, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तशी घोषणाही केली होती. मात्र, मेट्रो मार्गिकेची कामे लांबली होती. त्यातून कामे पूर्ण होऊन आता सीएमआरएस तपासणीस विलंब झाला आहे. त्यातून ही मेट्रो आता १६ जानेवारीनंतर आचारसंहिता संपल्यानंतर सुरू होऊ शकेल.
मेट्रो ९ मार्गिका
- १३.६ किमी लांबी
- १० स्थानके
- ६६०७ कोटी रुपये खर्च
एमएमआरडीएद्वारे मेट्रो मार्गिकेवर १० स्थानकांची उभारणी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेची उभारणी केली जात आहे. या मेट्रो मार्गिकेची लांबी १३.६ किमी असून त्यावर १० स्थानके असतील. पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगावपर्यंतचा ४.४ किलोमीटरचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
सीएमआरएस पथकाकडून पाहणी
या मेट्रो मार्गिकेसाठी नुकतेच इंडिपेंडंट सेफ्टी अॅसेसमेंट (एएसए) प्रमाणपत्र एमएमआरडीएला मिळाले आहे. या मेट्रो मार्गिकेवर ११ डिसेंबर आणि १२ डिसेंबर है दोन दिवस सीएमआरएस पथकाने पाहणी केली आहे. त्यांनी काही सूचना दिल्या आहेत. तसेच अंतिम तपासणीसाठी सीएमआरएस येणार आहेत.