Join us

भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय अपघात; जखमी डॉक्टरचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 03:01 IST

भायखळा येथील भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालायातील लिफ्टच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या दंतचिकित्सक डॉ़ अरनवाज हवेवाला यांचा गुरुवारी मृत्यू झाला.

मुंबई  - भायखळा येथील भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालायातील लिफ्टच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या दंतचिकित्सक डॉ़ अरनवाज हवेवाला यांचा गुरुवारी मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद पालिका मुख्यालयात शुक्रवारी उमटले. वस्तुसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाला जाब विचारावा, कारभार त्यांच्या हातून काढून घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. तसेच या वस्तुसंग्रहालयाचे अध्यक्ष असूनही या अपघाताबाबत अंधारात ठेवण्यात आल्याची तीव्र नाराजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केली आहे.वस्तुसंग्रहालयातील लिफ्ट २८ एप्रिल रोजी तुटून खाली कोसळल्यामुळे दंतचिकित्सक डॉ. अरनवाज हवेवाला व त्यांची मुलगी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्या ६३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मृत्यूला वस्तुसंग्रहालयाचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. या घटनेचे पडसाद महापालिकेतही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या गटनेत्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.महापौर या वस्तुसंग्रहालयाच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष आहेत. मात्र या दुर्घटनेची कोणतीच माहिती त्यांना देण्यात आली नव्हती, असे त्यांनी सांगितले. या वस्तुसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या खाजगी संस्थेमुळे आपणास रोषाला सामोरे जावे लागत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. या दुर्घटनेची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी; तसेच या वस्तुसंग्रहालयाचा प्रशासकीय कारभार पालिकेने आॅक्टोबर २०१९ पर्यंत ताब्यात घ्यावा, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :मृत्यू