bharat ratna for savarkar given 100 percent possibility says nitin gadkari | सावरकरांना 100 टक्के भारतरत्न मिळणार, त्यांना सन्मान देण्याची हीच योग्य वेळ- गडकरी

सावरकरांना 100 टक्के भारतरत्न मिळणार, त्यांना सन्मान देण्याची हीच योग्य वेळ- गडकरी

मुंबईः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक असलेल्या विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न 100 टक्के मिळणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच त्यांना सन्मान मिळण्याची हीच योग्य वेळ असल्याचंही ते म्हणाले, CNN-News18 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख मुद्दा राहिलेल्या सावरकरांवर गडकरी म्हणाले, त्यांच्याबद्दल इतिहासाचा चुकीचा दाखला देऊन विरोधक टीका करतात. आता हीच ती वेळ आहे की, त्यांचा योग्य सन्मान मिळेल. 

पुढे ते म्हणाले, सावरकर प्रकरणात न्यायालयानंही स्पष्ट निर्णय दिलेला आहे. महात्मा गांधींच्या हत्येपासून काँग्रेसकडून लावण्यात आलेले आरोप निराधार आणि इतिहासाच्या विरोधातले आहेत. काँग्रेस नेहमीच लोकांची दिशाभूल करते. सावरकरांनी पूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण केलं, ते आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. ज्यांनी सावरकरांचा इतिहास आणि साहित्य वाचलं नाही, तेच त्यांच्या विरोधात बोलतात, हे दुर्दैव आहे. सावरकरांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देणं हा आमच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नाही. ही लोकांची अनेक काळापासून चालत आलेली मागणी आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 100 टक्के भारतरत्न हा सन्मान मिळणार आहे.

राज्य सरकारनं पुरस्कारासाठी नाव सुचवलेलं असून, त्यावर केंद्र सरकार योग्य निर्णय घेईल. शिवसेनेनं या प्रस्तावाला केलेल्या विरोधावर ते म्हणाले, शिवसेना निवडणुकीत वेगळी भूमिका घेण्यासाठी स्वतंत्र आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपानं गेल्या पाच वर्षांत चांगलं काम केलं आहे. त्या कामाच्या आधारेच आम्हाला जनता पुन्हा निवडून देईल ही आशा आहे. विरोधक कमकुवत होत असण्याला आम्ही जबाबदार नाही. तसेच आदित्य ठाकरेंच्या उपमुख्यमंत्रिपदासंदर्भात फडणवीस योग्य निर्णय घेतील, असंही ते म्हणाले आहेत. पीएमसी बँक आणि मंदीच्या मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. पीएमसी बँकेतील घोटाळ्याला अर्थ मंत्र्यांनी गांभीर्यानं घेतलं आहे. गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, लवकरच आरबीआय आणि महाराष्ट्र सरकार यासंदर्भात काम करणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bharat ratna for savarkar given 100 percent possibility says nitin gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.