Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणार, इंडिया आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 18:16 IST

Bharat Jodo Nyaya Yatra : भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाची सभा ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथेच होणार हे आता निश्चित झाले आहे. येथे होणाऱ्या सभेला राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाची सभा ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथेच होणार हे आता निश्चित झाले आहे. येथे होणाऱ्या सभेला राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समाप्तीची सभा ही मुंबईत होणार आहे. या सभेमध्ये विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. १७ मार्च रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राहुल गांधी यांची ही सभा होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर राहुल गांधींनी यावर्षी पूर्वोत्तर भारतामधून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली होती. देशातील विविध राज्यांमध्ये फिरून आता ही यात्रा अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, या यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. नंदूरबार येथून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल व १७ मार्चला मुंबईत समारोप होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित असतील व लोकसभा निवडणुकीचा शंखनाद फुंकला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. 

टॅग्स :राहुल गांधीभारत जोडो यात्रामुंबईकाँग्रेस