Join us  

Bharat Bandh : अशोक चव्हाणांचा कार्यकर्त्यासह अंधेरी स्थानकात रेलरोको

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 10:30 AM

Bharat Bandh : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

मुंबई - पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. अशोक चव्हाण यांच्यासहीत सर्व काँग्रेस नेते, कार्यकर्त रेल्वे रुळावर उतरले आणि यावेळी त्यांनी लोकल अडवण्याचा प्रयत्न केला. आंदोलनामध्ये अशोक चव्हाणांसोबत माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह अन्य नेतेमंडळीही उपस्थित होते. गर्दीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून वेळीच हस्तक्षेप करत डी.एन. नगर पोलिसांनी अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि संजय निरूपम यांना ताब्यात घेतले. 

डिझेल व पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर अंधेरी स्थानकात रेल रोको करण्यात आला. या बंदच्या माध्यमातून, आधी चार राज्यांत विधानसभेच्या व नंतर लोकसभेची निवडणूक होणार असताना, मोदी सरकारचे अपयश जनतेपुढे मांडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल. 

काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेनं या बंदला पाठिंबा दिलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 88.12 रुपये मोजावे लागत आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असताना दुसरीकडे रुपयाची घसरण सुरूच आहे.

(Bharat Bandh : पुण्यात बंदला हिंसक वळण, पीएमपीची बस जाळली)

'बंद यशस्वी करा'दरम्यान, शांततामय मार्गाने बंद यशस्वी करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

बेस्टच्या बसवर दगडफेक

वाशी नाका परिसरात आंदोलकांनी बेस्टच्या बसवर दगडफेक केली. तसेच, प्रतिक्षानगर बस डेपोमध्ये सुद्धा काही बसची तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या घटनेत बसच्या काचा फोडण्यात आल्या. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चेंबूर नाका येथे डायमंड पेट्रोल पंपावर मनसेने अनोखे आंदोलन केले. यावेळी मनसेने पेट्रोल पंपवर गाढव आणले आणि सरकारविरोधात निदर्शनं नोंदवली.  

टॅग्स :भारत बंदअशोक चव्हाणकाँग्रेस