The Bhanushali building collapsed at the fort | Mumbai Building Collapse: फोर्ट येथे भानुशाली इमारत कोसळली

Mumbai Building Collapse: फोर्ट येथे भानुशाली इमारत कोसळली

 

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच फोर्ट येथील लकी हाऊस लगतच्या भानुशाली या तळमजला अधिक पाच मजली इमारतीच्या एक बाजुचा भाग कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. तर मालाड-मालवणी येथील प्लाट नंबर ८ बी वरील तळमजला अधिक दोन मजली चाळीचा भाग गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. या दोन्ही ठिकाणी शोधकार्य आणि मदत कार्य हाती घेण्यात आले. शिवाय पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिकांनी फोर्ट येथे वेगाने काम हाती घेतले. रात्री उशिरा पर्यंत येथील ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. 

फोर्ट येथील लकी हाऊस लगतच्या भानुशाली या तळमजला अधिक पाच मजली इमारतीच्या एक बाजुचा भाग कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या मलब्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. दुर्घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य हाती घेत मलबा हटविण्यास सुरुवात केली. यासाठी ४ चार फायर इंजिन, १ रेस्क्यू व्हॅन, रुग्णवाहिका आणि जेसीबी याची मदत घेण्यात आली. रात्री ऊशिरापर्यंत येथील मलबा उचलण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

दुसरीकडे मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच मालाड-मालवणी येथील प्लाट नंबर ८ बी वरील तळमजला अधिक दोन मजली चाळीचा भाग गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळ्याची दुर्घटना घडली. दुर्घटनेत सुरुवातीला ५ ते ६ जण अडकल्याचे प्राथमिक वृत्त होते. तत्काळ येथे शोधकार्य हाती घेण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत कार्याला सुरुवात केली. शिवाय ढिगारा उपसण्याचेही काम हाती घेतले. येथे अडकलेल्या २ व्यक्तींना अग्निशमन दलाच्या वतीने बाहेर काढण्यात आले. आणि १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होईपर्यंत येथे अडकलेल्या दोन व्यक्तींना नागरिकांनी खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी ४ फायर इंजिन, १ रेस्क्यू व्हॅन आणि रुग्णवाहिका तैनात करत उशिरापर्यंत  शोधकार्य सुरु होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The Bhanushali building collapsed at the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.