Join us  

भागवत, गडकरींनी यावे, राज्यातील सत्तेचे समीकरण सोडवावे; या नेत्याने केली मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 7:01 PM

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून शिवसेना आणि भाजपामध्ये निर्माण झालेला तिढा अद्याप जैसे थे आहे. त्यामुळे राज्यात अजूनही नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही.

मुंबई - महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून शिवसेना आणि भाजपामध्ये निर्माण झालेला तिढा अद्याप जैसे थे आहे. त्यामुळे राज्यात अजूनही नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे राज्यातील पेचप्रसंग सोडवण्याची विनंती केली आहे. शिवसेनेचे नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे सल्लागार असलेल्या किशोर तिवारी यांनी नितीन गडकरी यांना दोन्ही पक्षांमधील तणाव निवळण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे. तसेच तिवारी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही पत्र लिहून या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.  तिवारी म्हणाले की, ''भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शिवसेनेशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी आम्ही केली आहे. ते केवळ युतीधर्माचे पालनच करणार नाहीत तर दोन तासांमध्ये या परिस्थितीतून तोडगाही काढतील. दरम्यान, सगळे अडथळे पार झाले तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्या ३० महिन्यांसाठी मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यानंतर उर्वरित कार्यकाळासाठी कुणाला मुख्यमंत्री करायचे, याचा निर्णय भाजपा घेऊ शकते.''   ''भाजपा आणि शिवसेनेची सध्याची भूमिका आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती पाहता गडकरींसारख्या कुठल्यातरी अनुभवी नेत्याला महाराष्ट्रात हिंदुत्व आणि विकाच्या अजेंड्यावर काम करण्यासाठी पाठवण्याची गरज आहे.'' असेही तिवारी यांनी सांगितले. मात्र दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या तरुण भारतमधून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. राऊत यांना शेखचिल्लीची उपमा अग्रलेखातून देण्यात आली आहे.  दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होताना दिसत आहेत. दरम्यान, राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील आणि काँग्रेस त्याला बाहेरून पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.    

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शिवसेनाभाजपाराजकारण