यापुढे हातात प्लास्टीक पिशवी दिसल्यास खबरदार; प्रत्येक वॉर्डात पाच जणांचे पथक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 12:29 IST2023-08-17T12:28:48+5:302023-08-17T12:29:48+5:30
सोमवारपासून छापा टाकणार

यापुढे हातात प्लास्टीक पिशवी दिसल्यास खबरदार; प्रत्येक वॉर्डात पाच जणांचे पथक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिकवर बंदी असतानाही मुंबईत फेरीवाले तसेच व्यापाऱ्यांकडून त्याचा सर्रास वापर केला जातो. मुंबई महापालिकेने प्लास्टिकविरोधात सोमवारपासून कारवाई आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून, पोलिस, एमपीसीबी, पालिकेचे अधिकारी अशा पाच जणांचे पथक छापा घालणार आहेत.
बंदी असतानाही मुंबईत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. पालिकेकडून व्यापारी, फेरीवाले, दुकानदारांवर छापा टाकून दरवेळी हे प्लास्टिक जप्त केले जाते. मात्र, असे असतानाही प्लास्टिकचा वापर सुरूच आहे. प्लास्टिक संपूर्णपणे बाजारातून हद्दपार करण्यासाठी पालिकेने वॉर्ड स्तरावरचा अधिकारी, एमपीसीबीचा अधिकारी तसेच पोलिस अधिकारी अशा एकूण ५ जणांचे पथक स्थापन केले असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २४ अधिकाऱ्यांची अंतिम नावे गेल्या शुक्रवारी पालिकेला पाठविली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, पालिकेच्या पथकाने केवळ दाखविण्यापुरती कारवाई करू नये अशी मुंबईकरांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दुकाने, बाजारपेठा आणि मॉलवर लक्ष
- पाच जणांचे हे पथक प्लास्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही याची शहानिशा करणार असून, गेल्या वर्षभरात पालिकेने प्लास्टिक जप्त करून ७९ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
- दुकाने, बाजारपेठा आणि मॉलमध्ये हे पथक धडक देणार असून, सगळ्यात जास्त प्लास्टिक पिशव्या रस्त्यावरील फेरीवाल्यांकडे आढळतात.
- त्यांच्यावर या पथकाचे विशेष लक्ष असेल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.