चिनी हॅकर्सच्या इमेलपासून सावधान, २० लाख नागरिक लक्ष्य असल्याचा सायबर विभागाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:31 IST2020-06-24T05:09:19+5:302020-06-24T07:31:01+5:30
हा सायबर हल्ला करण्यासाठी चिनी हॅकर्स एका इमेलचा वापर करत आहेत. त्यापासून सावध रहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.

चिनी हॅकर्सच्या इमेलपासून सावधान, २० लाख नागरिक लक्ष्य असल्याचा सायबर विभागाचा इशारा
मुंबई : सध्याच्या काळात भारत-चीन सीमेवरील वाद पाहता, चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याचे समजते. हा सायबर हल्ला करण्यासाठी चिनी हॅकर्स एका इमेलचा वापर करत आहेत. त्यापासून सावध रहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.
चीनच्या हॅकर्सनी २० लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचे ठरवले आहे. यामध्ये एक इमेल आयडीही समोर आला आहे. चिनी हॅकर्स ncov2019@gov.in या मेलच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहे. या सायबर हल्लयामध्ये भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे. तुम्हाला आकर्षित करणारा/ आर्थिक प्रलोभन देणारा विषय असलेला मेल पाठवला जाईल. जसे की Free Covid Test, Free Covid-19Kit. त्या मेलमध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाउनलोड
करण्यासाठी सांगितले असेल. covid2019@gov.in / ncov2019.gov.in अशा बनावट सरकारी मेलवरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते. त्याला प्रतिसाद न देण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. सायबर सुरक्षा संगणक, मोबाइलसाठी अधिकृत अॅण्टी व्हायरस वापरा. महत्वाच्या माहितीचा नियमित बॅकअप घ्या. संशयास्पद इमेल उघडू नका. लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहनही सायबर विभागाने केले.
।पाच दिवसांत ४० हजार सायबर हल्ले
चिनी हॅकर्सकडून देशातील सायबर क्षेत्रावर आक्रमण करण्यात आले असून प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चर, माहिती आणि बँकिंग क्षेत्राला लक्ष्य केले आहे. गेल्या ४-५ दिवससांत त्यांच्याकडून ४० हजार ३०० सायबर हल्ले करण्यात आले आहेत. त्याला प्रतिबंधासाठी प्रत्येकाने जागरूक राहून आपल्या अकाऊंटसची सुरक्षा व दक्षता बाळगावी, त्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घ्यावी.
- यशस्वी यादव, विशेष महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर विभाग