Join us  

व्यावसायिकपेक्षा निवासी जागांना चांगले भवितव्य  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 6:19 PM

Residential and commercial spaces : रिअल इस्टेट क्षेत्राच्या अपेक्षांची उसळी

मुंबई : कोरोना संक्रमणातील गेले आठ महिने अभूतपूर्व घसरण अनुभवलेल्या बांधकाम क्षेत्राचे भवितव्य पुढील सहा महिन्यात चांगले असेल अशी आशा निर्माण झाली आहे. त्याचा सर्वाधिक फायदा गृहनिर्माणला होईल. घरांच्या विक्रीत वाढ होईल असे मत ६६ टक्के भागधारकांनी व्यक्त केले असून नव्या प्रकल्पांची मुहुर्तमेढ रोवली जाईल असे वाटणा-यांचे प्रमाण ५० टक्के आहे. कार्यालयीन बांधकामांच्याबाबतीच हे प्रमाण अनुक्रमे ४७ आणि ३२ टक्के आहे. घरांच्या किंमती कमी होतील असे वाटणा-यांचे प्रमाण ४० टक्के आहे.  

नाईट फ्रँक, एसआयसीसीआय आणि नरेडको या प्रतिथयश संस्थांच्या संयुक्त विद्यमाना रिअल इस्टेट सेंटिमेंट इंडेक्स क्यू ३ – २०२० हा अहवाल गुरूवारी प्रसिध्द करण्यात आला. त्यातून हे आशादायी चित्र समोर आले आहे. कोरोनाचे संक्रण सुरू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्राला पुन्हा उभारी मिळेल असे वाटणा-यांची संख्या फक्त २२ टक्के होती. ती गेल्या तिमाहीत ४० टक्क्यांपर्यंत वाढली असून आता ही आशा बाळगणा-यांचे प्रमाण ५२ टक्के झाले आहे. गेल्या तिमाहीत निवासी बांधकामांच्या खरेदी विक्रीत तेजी निर्माण झाल्याने या क्षेत्राचा आशा पल्लवित झाल्या आहेत.  

स्वस्त गृहकर्ज, विविध सवलतींमुळे कमी झालेल्या घरांच्या किंमतींमुळे घरांच्या विक्रीला चालना मिळत असून ती गेल्या तिमाहीपेक्षा ५५ टक्क्यांनी वाढली आहे. सध्याच्या उत्सवी काळात त्यात आणखी वाढ होणार असून हे चित्र  निश्चितच आशादायक असल्याचे मत नाईट फ्रँकचे चेअरमन शिरीष बैजल यांनी व्यक्त केले आहे. सर्वाधिक वृध्दी देशाच्या दक्षिणेतील राज्यात होताना दिसत असून त्या खोलाखाल पश्चिमेकडील राज्यांचा क्रमांक लागत असल्याचे हा अहवाल सांगतो.

आर्थपुरवठ्यातही आशादायी चित्र : आर्थिक आघाड्यांवर आशेचा किरण दिसत असल्याचे मत ५७ टक्के भागधारकांना व्यक्त केले असून परिस्थिती आणखी चिघळेल असे ३७ टक्के लोकांना वाटत आहे. या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या वित्त पुरवठा वाढेल असे वाटणा-यांचे मत गेल्या दोन तिमाहिमध्ये २५ वरून ३८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

टॅग्स :बांधकाम उद्योगमुंबईमहाराष्ट्र