Join us  

पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांचा विश्वासघात; विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 3:53 PM

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची सुरक्षा कंत्राटदार पोलिसांकडे देणे कितपत योग्य आहे?, असा सवाल विजय वडेट्टीवर यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई: गेल्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारने राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. आता यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत कंत्राटी पद्धतीने ३ हजार पोलिसांची भरती करण्यास हिरवा कंदील  दिला आहे. आता मुंबईत कंत्राटी पद्धतीने ३ हजार पदे भरण्यात येणार आहेत. ही पद ११ महिन्यांसाठी असणार आहेत. मुंबईत भरती करण्यास गृह विभागाने मंजूरी दिली आहे. यासाठी ३० कोटी रुपये राखीव ठेवण्यात येणार आहेत. राज्य सुरक्षा महामंडळातर्फे कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. 

राज्य सरकारच्या या निर्णयावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. एकीकडे पोलिस भरतीचा पेपर फुटतो, दुसरीकडे मुंबईत तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याची जाहिरात निघते. प्रामाणिकपणे मेहनत करून पोलिस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांचा विश्वासघात महायुती सरकार करत आहे. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची सुरक्षा कंत्राटदार पोलिसांकडे देणे कितपत योग्य आहे?, असा सवाल विजय वडेट्टीवर यांनी उपस्थित केला आहे. 

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, कंत्राटी भरती करण्यासाठी जे कारण सरकारने दिले आहे त्यात कुठला ही तर्क नाही. उत्सव काळात अतिरिक्त मनुष्यबळ लागेल हे सरकारला आता कळले का? पेपरफुटीची दखल घ्यायची नाही,  शासकीय भरती टाळायची आणि कंत्राटी भरती करायची. राज्य सरकारने कंत्राटी पोलिस भरतीचा निर्णय मागे घेऊन  पोलीस भरतीचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा आणि भरतीसाठी प्रामाणिकपणे घाम गाळणाऱ्या युवक युवतींना पोलिस दलात संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांकडे मनुष्य बळाची कमतरता आहे. दुसरीकडे नव्याने पोलिस भरती प्रक्रियेसाठी अवधी असून तोपर्यंत ही कंत्राटी पदे भरली जाणार आहेत. यासाठी पोलीस आयुक्तांनी सरकारला विनंती केली होती, ही विनंती आता गृह विभागाने मान्य केली आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या, विस्तार, व्यापार, गुन्हेगारीसह सर्वच बाबतीतील व्याप्ती पाहता मुंबईत पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी, सरकारने पोलीस भरतीची जाहिरातही काढली आहे. मात्र, या जाहिरातीतील पदांची संख्या पुरसे नसल्याने आता कंत्राटी पद्धतीने मुंबईसाठी पोलीस भरती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ११ महिन्यांच्या कंत्राटी करारानुसार ही भरती होईल.

टॅग्स :पोलिसमुंबईविजय वडेट्टीवारमहाराष्ट्र सरकार