Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नॉट 'बेस्ट'! मुंबईकरांचे झाले हाल, प्रवासासाठी मोठी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 13:24 IST

'बेस्ट' कंत्राटदार कामगारांच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना शुक्रवारी त्रासाचा सामना करावा लागला.

मुंबई :

'बेस्ट' कंत्राटदार कामगारांच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना शुक्रवारी त्रासाचा सामना करावा लागला. अनेक महत्त्वाच्या मार्गावर बेस्टची बस धावली नसल्याने प्रवासाठी मोठी कसरत करावी लागली. 'बेस्ट'च्या काम बंद आंदोलनामुळे बॅकबे, कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, प्रतिक्षा नगर, धारावी, काळाकिल्ला, देवनार, शिवाजीनगर, घाटकोपर, मुलुंड, मजास, सांताक्रूझ, ओशिवरा, मालवणी, गोराई आणि मागाठणे अशा एकूण २० आगारांच्या बस प्रवर्तनावर फरक पडला. खासगी बसपुरवठा कंत्राटदार यांच्या कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे सकाळी ९ पर्यंत एकूण १३७५ बेस्ट बस रस्त्यांवर धावल्या नाहीत.

बेस्टच्या आंदोलनात एस एम टी, मातेश्वरी, टाटा, हंसा, ओलेक्ट्रा, आणि स्विचच्या कामगारांनी सहभाग घेतला होता. असे असले तरी एस एम टी, मातेश्वरी, हंसा या व्यवसाय संस्थेच्या अनुक्रमे ७६, ३५ आणि १६२ बस रस्त्यांवर होत्या. या संस्थेविरुद्ध कंत्राटीच्या अटी आणि शर्तीप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. त्यांना त्यांच्या कामगारांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहे.

एसटीची बेस्टला मदत...बेस्ट मध्ये अचानक कंत्राटी कर्मचायांचा संप सुरु झाल्याने त्यांच्या अनेक बसेस रद्द करण्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर बेस्टने या संदर्भात एसटी कडे जादा बसेस सोडण्याची मागणी केली. त्यानुसार आज पासून बेस्टच्या ६ डेपोला प्रत्येकी २५ याप्रमाणे १५० बसेस एसटीने पुरविलेल्या आहेत. बेस्टची वाहतूक सुरळीत होईपर्यंत सदर बसेस बेस्टच्या ताफ्यामध्ये सेवा देतील अशी माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, बेस्ट आपल्या जास्तीत जास्त बस चालकांचा वापर करून जास्तीत जास्त गाड्या सोडत आहे. जेणे करून प्रवाशांना बस सेवा मिळेल

 

टॅग्स :बेस्ट