Join us
Daily Top 2Weekly Top 5

7 जानेवारीपासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 20:25 IST

विविध मागण्यांसाठी कर्मचारी उपसणार संपाचं हत्यार

मुंबई: बेस्ट कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. वेतनवाढ आणि वेतन निश्चितीबद्दलच्या रखडलेल्या मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्यानं बेस्ट कर्मचारी संपाचं हत्यार उपसणार आहेत. बेस्ट महाव्यवस्थापकांसोबत आज कामगार संघटनेची बैठक झाली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संपावर जाण्याचा निर्णय घेतला. महाव्यवस्थापकांसोबतच्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्यानं बेस्ट कर्मचारी आक्रमक झाले. यानंतर संप करण्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये मतदान घेण्यात आलं. यात संपाच्या बाजूनं भरघोस मतदान झालं. बेस्टचे सुमारे 30 हजार कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. याचा मोठा परिणाम मुंबईतील वाहतुकीवर होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?- बेस्टचा 'क' अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या 'अ' अर्थसंकल्पात विलीन करण्याबद्दलच्या मंजूर ठरावाची तातडीनं अंमलबजावणी करावी- 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रुपयांपासून सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावानं वेतन निश्चिती करण्यात यावी.- एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतन करारावर तातडीनं वाटाघाटी सुरू कराव्या.- 2016-17 आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा.- कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढला जावा- अनुकंपा भरती सुरू करावी 

टॅग्स :बेस्टसंपमुंबई