Join us

बेस्ट शक्य त्या ठिकाणी बढती धोरण राबवणार! नियमबाह्य भरतीला संघटनांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:18 IST

बेस्ट उपक्रमात मुख्य व्यवस्थापक पदावर असलेल्या अधिकाऱ्याच्या सेवा निवृत्तीला १५ दिवस शिल्लक असताना त्यांना उपमहाव्यवस्थापक पदावर बढती देण्यात आली.

मुंबई : बेस्ट उपक्रमात मुख्य व्यवस्थापक पदावर असलेल्या अधिकाऱ्याच्या सेवा निवृत्तीला १५ दिवस शिल्लक असताना त्यांना उपमहाव्यवस्थापक पदावर बढती देण्यात आली. एका बाजूला कामगारांना बढती देताना आर्थिक तुटवड्याचे कारण पुढे केले जाते, मग अधिकाऱ्यांना कशी बढती मिळते, असा सवाल करत कामगार संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, याबाबत कामगार संघटनांशी चर्चा करून शक्य तेथे बढती धोरण राबविले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे, असे कामगार नेते सुहास सामंत यांनी सांगितले.

मागील कित्येक वर्षांपासून बेस्टची  नोकर भरती बंद आहे. मात्र, अचानक एक पद सोडून आणखी वरच्या पदावर (जंपिंग) झालेल्या या अधिकारी बढतीमुळे चर्चेला उधाण आले आहे. प्रशासनाने कोणाच्या राजकीय हस्तक्षेपाने ही बढती दिली का, असा सवालही उपस्थित होत आहे. त्यातही सेवानिवृत्तीला पंधरा दिवस शिल्लक असताना दिलेल्या या बढतीमुळे बेस्टच्या तिजोरीवर भार येणार आहे. त्यामुळे बेस्टमधील दोन कामगार संघटनांनी या बढतीला विरोध केला असून कामगार सेनेने मंगळवारी बेस्टच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.बढतीला आमचा विरोध नाही; पण, एवढी वर्षे हे पद का भरले नाही. केवळ १५ दिवसांसाठी हे पद तत्काळ का भरले? याचा आर्थिक फटका बेस्टच्या तिजोरीला पडणार आहे, याकडे सामंत यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :बेस्टमुंबई