Join us  

BEST Strike : 'आधी बेस्ट संपावर तोडगा काढा', मनसैनिकांनी कोस्टल रोडचं काम थांबवलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:52 AM

BEST Strike : संपकरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देबेस्टच्या संपाचा सातवा दिवस, मुंबईकरांचे अतोनात हालबेस्ट संपाच्या वादात मनसेची उडी, मनसैनिक उतरले रस्त्यावरआधी संपावर तोडगा काढा, मग कोस्टल रोडचं काम करा - मनसे

मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा सातवा दिवस आहे. प्रशासनाला अद्याप संपावर कोणताही तोडगा काढण्यात यश आलेले नाही. मात्र यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे संपकरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीबरोबर चर्चा झाल्यानंतरही लेखी आश्वासन मिळेपर्यंत बेस्ट कामगार संघटना माघार घेण्यास तयार नसल्याने बेस्ट कामगारांचा संप सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे.

दरम्यान,  संपावर असलेल्या एकाही ‘बेस्ट’ कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ देणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले आहे. या संपातून मार्ग निघणे गरजेचे असून आम्ही सर्वाशी चर्चा केली, मात्र तोडगा निघू शकला नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली. 

बेस्ट कर्मचारी आणि प्रशासनाच्या वादात सर्वसामान्य जनता वेठीस धरली जात आहे. संपामुळे मुंबईकरांचे मात्र अतोनात हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वादात उडी घेतली असून आपले आंदोलन सुरू केले आहे. 'आधी बेस्टच्या संपावर तोडगा काढा, मग कोस्टल रोडचं करा', अशी मागणी करत मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. कोस्टल रोड प्रकल्प हा शिवसेनेचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. वरळी परिसरात सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामाला मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. कोस्टल रोडचं काम करणारे कर्मचारी आणि सर्व यंत्रणा येथून हलवण्यास मनसैनिकांनी भाग पाडले. तसंच तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या कार्यालयालाही टाळे ठोकण्यात आले आहे. 'जोपर्यंत संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचं काम होऊ देणार नाही',असा इशारा देत मनसैनिकांनी कोस्टल रोडचं काम बंद पाडले आहे. यापूर्वी, रविवारी(13 जानेवारी) देखील मनसेकडून बेस्ट प्रशासनाकडून इशारा देण्यात आला होता. संपावर तोडगा काढला नाही तर मुंबईत तमाशा करू, असा इशारा मनसेनं दिला होता.  

जोपर्यंत बसच्या संपावर तोडगा निघत नाही तोपर्यंत सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेच्या कोणत्याही प्रकल्पांचे काम चालू द्यायचे नाही, अशी भूमिका मनसेनं स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. 

या मागण्यांसाठी संप1. महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे 2016-2017, 2017-2018 या काळातील सानुग्रह अनुदान मिळणे2.एप्रिल 2016पासून लागू होणाऱ्या वेतन कराराच्या तातडीने वाटाघाटी3. अनुकंपा तत्त्वावर तातडीने भरती4. बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण करण्याचा महापालिका महासभेत मंजूर झालेल्या ठरावावर अंमल5. कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवणे

संपाचा सातवा दिवसबेस्ट कामगारांनी 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. आतापर्यंतचा बेस्ट कामगारांचा हा सर्वात मोठा संप ठरला आहे. घर खाली करून घेणे, मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस अशा कारवाईनंतरही कामगार मागे हटण्यास तयार नाहीत. अखेर संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिकाच दाखल झाल्यानंतर, राज्य सरकारने कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली़ या समितीसोबत झालेल्या बैठकीनंतरही संप मिटलेला नाही.

कोट्यवधींचा बुडाला महसूलगेले सहा दिवस एकही बस आगाराबाहेर पडलेली नाही. बेस्ट उपक्रमाला दररोज बसभाड्यातून तीन कोटी रुपये उत्पन्न मिळते. त्यामुळे गेल्या सहा दिवसांमध्ये एकूण १८ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.

उद्धव ठाकरेंनी दिले हे आश्वासन

बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक उपाययोजना आहेत, त्या करायला हव्यात. बेस्टच्या संपात राजकारण आणण्याची माझी इच्छा नाही. अवाजवी मागण्या केल्या, तर अजून समस्या निर्माण होतील. खासगीकरण हा अंतिम पर्याय नाही, पण जरी करायचा विचार समोर आला, तरीही मालकी हक्क आम्ही जाऊ देणार नाही. एकाही कामगाराची नोकरी जाणार नाही. संपूर्ण खासगीकरण होऊ देणार नाही. झालेच तर फक्त काही बस गाड्यांचे असू शकेल. मात्र, यावर अद्याप निर्णय झालेला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

टॅग्स :बेस्टमनसेसंप