सार्वजनिक वाहनतळावर पार्किंगसाठी ‘बेस्ट’ शटल सर्व्हिस, वाहतूककोंडीवर उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 03:24 AM2019-09-29T03:24:42+5:302019-09-29T03:24:56+5:30

सार्वजनिक वाहनतळावर वाहने उभी करण्यासाठी मुंबईकरांना प्रोत्साहन देण्याकरिता महापालिका प्रशासन शटल सेवा सुरू करणार आहे.

'Best' shuttle service for public Vehicles parking lot | सार्वजनिक वाहनतळावर पार्किंगसाठी ‘बेस्ट’ शटल सर्व्हिस, वाहतूककोंडीवर उतारा

सार्वजनिक वाहनतळावर पार्किंगसाठी ‘बेस्ट’ शटल सर्व्हिस, वाहतूककोंडीवर उतारा

Next

मुंबई : सार्वजनिक वाहनतळावर वाहने उभी करण्यासाठी मुंबईकरांना प्रोत्साहन देण्याकरिता महापालिका प्रशासन शटल सेवा सुरू करणार आहे. दादर येथील कोहिनूर स्क्वेअर येथून ही बस सेवा पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहे. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर व मोठमोठे मॉल व बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे या ठिकाणी आपले वाहन उभे करून या बस सेवेचा वापर इच्छित स्थळी जाण्यासाठी करू शकणार आहेत.

मुंबईत वाहनांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे वाहतूककोंडीची समस्या मोठी होत चालली आहे. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील २६ सार्वजनिक वाहतनळांच्या पाचशे मीटर परिसरात पार्किंगवर निर्बंध आणण्यात आले होते. त्याचबरोबर गेल्या महिन्यात मुंबईतील पाच रस्ते नो पार्किंग क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यानंतर आता शटल सर्व्हिसचा पर्याय पुढे आला आहे.

ही बस सेवा कोहिनूर स्क्वेअर ते रुबी टॉवर, नक्षत्र मॉल, स्टार मॉल आणि सिद्धिविनायक मंदिर इथपर्यंत असणार आहे. स्थानिक विभाग कार्यालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जी दक्षिण विभागातील २२ ठिकाणी नागरिक आपली वाहने रस्त्यावरच उभी करून शॉपिंगला जात असल्याचे आढळून आले. मात्र यापैकी अनेक रस्ते आता नो पार्किंग क्षेत्र जाहीर करण्यात आले असल्याने वाहनचालकांनी आपल्या गाड्या सार्वजनिक वाहनतळावर उभ्या कराव्यात, यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

वाहतूककोंडी फोडण्यासाठी केलेले प्रयत्न
मुंबईतील २६ सार्वजनिक वाहनतळांच्या पाचशे मीटर परिसरात वाहने उभी करण्यावर मनाई करण्यात आली. ७ जुलैपासून अशा बेकायदा पार्किंगवर कारवाई सुरू करण्यात आली.
मुंबईतील पाच रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. महार्षी कर्वे मार्ग- चर्चगेट ते ग्रँट रोड स्थानक, गोखले मार्ग - दादर ते पोर्तुगीज चर्च, पूर्व उपनगरातील लालबहादूर शास्त्री मार्ग - कल्पतरू ते निर्मल लाइफस्टाईल, डी.एन. नगर मेट्रो स्थानक ते ओशिवरा खाडी, स्वामी विवेकानंद मार्ग ते ओशिवरा खाडी.
ही शटल सर्व्हिस पार्किंगच्या स्थळापासून रुबी टॉवर, नक्षत्र मॉल, स्टार मॉल आणि सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी दररोज जाणार आहे. दर १५ मिनिटांनी ही सेवा वाहन मालकांना उपलब्ध होणार आहे. आपली वाहने सार्वजनिक वाहनतळावर उभी करून या बसद्वारे लोकांना इच्छित स्थळी पोहोचता येणार आहे.
 

Web Title: 'Best' shuttle service for public Vehicles parking lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.