Join us  

Mumbai North Lok Sabha Election: बेस्ट ही मुंबईची शान, तिला वाचवणे गरजेचे आहे - उर्मिला मातोंडकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 3:46 PM

उत्तर मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आज पोयसर डेपो येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला भेट दिली.

मुंबई -  उत्तर मुंबईच्याकाँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आज पोयसर डेपो येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला भेट दिली. उर्मिला मातोंडकर आणि मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस व बेस्ट समिती सदस्य भूषण पाटील यांना बेस्टच्या कामगारांनी आणि युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आमंत्रित केलॆ होते. यावेळी उर्मिला मातोंडकर यांनी बेस्ट कामगारांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या.

त्यावेळी उर्मिला मातोंडकर म्हणाल्या कि बेस्ट (BEST) ही मुंबईची शान आहे, मुंबईची लाईफ लाईन आहे, तिला जिवंत ठेवलेच पाहिजे, तिला वाचवणे गरजेचे आहे. मी माझ्या शालेय जीवनाचा संपूर्ण प्रवास बेस्टने केलेला आहे तसेच कॉलेजला हि मी बेस्टनेच जायची त्यामुळे बेस्ट हि नेहमीच माझ्या मनामध्ये आहे. परंतु आज बेस्टची दुर्दशा झालेली आहे. गेली २५ ते २७ वर्षे महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची सत्ता आहे त्यांनी नेहमीच बेस्टकडे दुर्लक्ष केले. बेस्ट कामगारांना बोनस मिळत नाहीत, वेळेवर पगार मिळत नाही. त्यांचे राहणीमान सुधारलेले नाही, अशा अनेक समस्या आहेत.

बेस्टचे कमीत कमी भाडे ७ रुपयांवरून १२ रुपये केले याचाच अर्थ सत्ताधाऱ्यांना पैसा मिळतो आहे तरी हि बेस्टची अवस्था दयनीय झालेली आहे. इतकी वर्षे शिवसेना भाजपची सत्ता असूनही बेस्टसाठी त्यांनी काहीच केलेले नाही. बेस्ट वाचविणे हे त्यांचे पहिले कर्तव्य आहे पण फक्त खोटी आश्वासने दिली गेली त्यामुळे आता सत्तांतराची हीच खरी वेळ आहे. यावेळी तुम्ही सर्व जण काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. मला तुम्ही निवडून द्या मी संसदेत तुमचे सर्व प्रश्न मांडीन आणि सोडवून दाखवीन. काँग्रेस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. आम्ही तुमच्या सर्व मागण्या मान्य करू. बेस्टला पुन्हा वैभवशाली दिवस आणून देऊ, अशी मी ग्वाही देते. 

या कार्यक्रमाला उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत भूषण पाटील आणि नितीन पाटील, अध्यक्ष, बेस्ट एम्प्लॉईज युनियन, बेस्ट कामगार युनियन, बेस्ट कामगार संगठन, राष्ट्रवादी बेस्ट युनियन आणि जागृत बेस्ट कामगार संगठन यांचे पदाधिकारी हि उपस्थित होते.

टॅग्स :उर्मिला मातोंडकरकाँग्रेसबेस्टमुंबई उत्तरलोकसभा निवडणूकमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019