Join us

मुंबईतील 'बेस्ट'चे कर्मचारी 8 जानेवारीपासून संपावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 20:25 IST

येत्या 8 जानेवारीपासून बेस्टचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

मुंबई: बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टचे कर्मचारी 8 जानेवारीपासून संपावर जाणार आहेत. संपावर जायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्यासाठी गुरुवारी मतदान घेण्यात आले होते. याची मतमोजणी शुक्रवारी झाली. यामध्ये 95 टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने मतदान केले आहे. 

संपाविषयी कर्मचाऱ्यांची नेमकी मते जाणून घेण्यासाठी कृती समितीच्यावतीने गुरुवारी बेस्टच्या सर्व आगारांमध्ये मतदान घेण्यात आले होते. या मतदानाला बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे समजते. मतदानाच्यावेळी एकूण 15 हजार 211 कर्मचाऱ्यांनी मतदान केले. त्यातील 95 टक्के म्हणजेच, 14 हजार 461 मते संपाच्या निर्णयाच्या बाजूने पडली. त्यामुळे आता 8 जानेवारीपासून बेस्टचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

दरम्यान, बेस्ट आणि मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प एकाच वेळी जाहीर करावा, 2016-17 आणि 2017-18मधील बोनससंबंधी तातडीने तोडगा काढावा आदी प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. 

टॅग्स :बेस्टमुंबईसंप