बेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रश्न अनुत्तरितच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 04:34 IST2018-10-24T04:33:52+5:302018-10-24T04:34:01+5:30
आगामी आर्थिक वर्षातही बेस्ट उपक्रम तुटीत असल्याने, यंदाच्या दिवाळीत कर्मचा-यांना बोनस मिळण्याची शक्यता धूसर आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रश्न अनुत्तरितच!
मुंबई : आगामी आर्थिक वर्षातही बेस्ट उपक्रम तुटीत असल्याने, यंदाच्या दिवाळीत कर्मचा-यांना बोनस मिळण्याची शक्यता धूसर आहे. बेस्ट समितीच्या बैठकीत याबाबत प्रशासनाने कोणतेच ठोस आश्वासन दिले नाही. त्यामुळे कर्मचाºयांच्या बोनसचा तिढा कायम आहे. बेस्ट उपक्रमाने २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात ७२० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या वर्षी बेस्ट उपक्रमाने कर्मचाºयांना साडेपाच हजार रुपये उचल दिली होती. ही रक्कम दिवाळी सणानंतर कर्मचाºयांच्या वेतनातून कापून घेण्यात आली होती. मात्र, या वर्षी कामगारांना बोनस मिळावा, बोनस मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, असे मत शिवसेनेचे सुहास सामंत यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत मंगळवारी व्यक्त केले.
सामंत यांच्या मागणीचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन केले. बेस्ट कामगारांच्या बोनसचा प्रश्न सोडविण्यास सत्ताधारी शिवसेना पक्ष अपयशी ठरले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. कोस्टल रोडसाठी करोडो रुपये खर्च करण्यात येतात. मात्र, बेस्ट कर्मचाºयांच्या बोनससाठी २५ कोटी महापालिका देत नाही, अशी नाराजी सदस्यांनी व्यक्त केली. मात्र, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे हे उपस्थित नसल्याने बोनसबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.
>चेंडू महापौरांच्या कोर्टात
कर्मचाºयांनी बोनसची मागणी केल्यानंतर वाटाघाटीच्या बैठका सुरू होतात. शेवटी हा प्रश्न दरवर्षी महापौर दालनात सोडविण्यात येतो. मात्र, बेस्ट आर्थिक संकटात असल्याने बोनसबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. याबाबत माहिती देताना, येत्या दोन-तीन दिवसांत महाव्यवस्थापकांबरोबर चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेण्यात येईल, असे बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी स्पष्ट केले. मात्र, तिथे निर्णय न झाल्यास महापौरांकडे दाद मागण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
>तिजोरीत खडखडाट : बेस्ट उपक्रमात ४४ हजार कर्मचारी असून, बोनससाठी ३५ कोटी रुपयांचा भार बेस्टच्या तिजोरीवर पडणार आहे. मात्र, तिजोरीत खडखडाट असल्याने बोनस देण्यासाठी बेस्टकडे पैसे नाहीत.