तब्बल १५ टक्क्यांनी महागणार बेस्टची वीज, मुंबईकरांना नववर्षाची ‘भेट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 06:09 IST2025-01-19T06:08:42+5:302025-01-19T06:09:01+5:30
बेस्टने १५ टक्के वाढ सुचविल्याने बेस्टच्या ग्राहकांना नव्या वर्षातच लाइट बिल जादा येणार आहे.

तब्बल १५ टक्क्यांनी महागणार बेस्टची वीज, मुंबईकरांना नववर्षाची ‘भेट’
मुंबई : शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील पाच वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केले आहेत.
बेस्टने १५ टक्के वाढ सुचविल्याने बेस्टच्या ग्राहकांना नव्या वर्षातच लाइट बिल जादा येणार आहे. टाटा आणि अदानी यांनी एका वर्षापुरता ग्राहकांना दिलासा दिला असला तरी पुढील वर्षापासून या दोन्ही वीजपुरवठादार कंपन्यांच्या ग्राहकांचा लाइट बिलाचा आकडा फुगणार आहे. तीनही कंपन्यांचे नवे वीजदर मार्चमध्ये जाहीर होऊन एप्रिलमध्ये लागू होतील.
वीज कंपन्यांची प्रत्येकी पाच वर्षांनी वीज दर निश्चिती होते. त्याला मल्टी इयर टेरिफ असे म्हणतात. पाचवे वर्ष संपत आले की वीज कंपन्या निर्मिती, वितरण, पारेषण खर्चानुसार महसुली गरज पूर्ण करण्यासाठी वीजदर याचिका आयोगाकडे दाखल करतात. ग्राहकांना दरवाढीच्या प्रस्तावांवर १० फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि हरकती दाखल करता येणार आहेत.
- २०२५-२६ मध्ये ग्राहकांना सरासरी १५ टक्के दर कपातीचा फायदा मिळेल. तर हरित ऊर्जादरांमध्ये ५० टक्के कपातीचा प्रस्ताव आहे. हे दर प्रति युनिट मागे ६६ पैशांवरून ३० पैसे कमी होतील, असे अदानी इलेक्ट्रिसिटीने सांगितले.
दर कमी होणार नाहीत
बेस्ट आणि टाटा चेंबूरच्या वीज निर्मिती केंद्रातून वीज घेतात. ही वीज खूप महाग आहे. मुंबईकरांना कमी दरात वीज द्यायची असेल तर मुंबईबाहेरून स्वस्तात वीज आणावी लागेल. मात्र मुंबईत वीज आणणाऱ्या वाहिन्यांची क्षमता संपली आहे. ही क्षमता वाढविल्याशिवाय बाहेरून वीज मुंबईत आणता येणार नाही आणि त्याशिवाय विजेचे दर कमी करता येणार नाहीत.
- अशोक पेंडसे, वीज तज्ज्ञ
वीज कंपन्यांचे दर रुपयांत
अदानी इलेक्ट्रिसिटी
युनिट आता नंतर
० ते १०० ३.८० ३.४५
१०१ ते ३०० ६.५० ५.९५
३०१ ते ५०० ८.५० ६.९०
५०१ हून अधिक ९.८० ६.९०
टाटा पॉवर
युनिट आता नंतर
० ते १०० २.१८ २.१५
१०१ ते ३०० ५.३६ ५.३५
३०१ ते ५०० ११.६२ ९.२०
५०१ हून अधिक १२.५६ १०.५०
बेस्ट
युनिट किती दरवाढ
० ते १०० २
१०१ ते ३०० ५.५५
३०१ ते ५०० ९.४५
५०१ हून अधिक ११.५५