बेस्ट प्रशासन, रेल्वेचीही परीक्षेसाठी जय्यत तयारी; ‘हात दाखवा, बस थांबवा,’ विद्यार्थ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 11:59 IST2025-02-21T11:58:59+5:302025-02-21T11:59:23+5:30

दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी रेल्वे, बेस्ट आणि पोलिस प्रशासनाकडून दक्षता घेतली जाणार आहे.

BEST administration, railways also preparing for exams; 'Show your hand, stop the bus,' appeal to students | बेस्ट प्रशासन, रेल्वेचीही परीक्षेसाठी जय्यत तयारी; ‘हात दाखवा, बस थांबवा,’ विद्यार्थ्यांना आवाहन

बेस्ट प्रशासन, रेल्वेचीही परीक्षेसाठी जय्यत तयारी; ‘हात दाखवा, बस थांबवा,’ विद्यार्थ्यांना आवाहन

मुंबई : दहावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रांवर पोहोचता यावे, यासाठी बेस्ट आणि रेल्वे प्रशासनाने तयारी केली आहे. बेस्ट प्रशासनाने विद्यार्थ्यांना ‘हाता दाखवा, बस थांबवा,’ असे आवाहन केले आहे. तर, लोकल सेवेत बिघाड होऊ नये, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडूनही खबरदारी घेतली जाणार आहे.

दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी रेल्वे, बेस्ट आणि पोलिस प्रशासनाकडून दक्षता घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास सुरळीत व्हावा, यासाठी बेस्ट बसला हात दाखविल्यास बस थांबवण्याचे निर्देश वाहनचालक, कंडक्टर आणि निरीक्षकांना दिले आहेत.

बसच्या मार्गावर दहावीच्या परीक्षेचे केंद्र असल्यास विद्यार्थ्यांना केंद्रावर सोडण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना शक्य तितके सहकार्य करण्याचे निर्देश उपक्रमाने बसचालक व कंडक्टर यांना दिले आहेत.

बेस्ट उपक्रमात गाड्यांचा ताफा आवश्यकतेपेक्षा कमी आहे. त्यामुळे यासाठी विशेष गाड्यांची व्यवस्था उपक्रमाला करता येणार नसली तरी आहे त्या ताफ्यात विद्यार्थ्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना आगारांना दिल्या आहेत.

 एखाद्या केंद्राला आवश्यकता असल्यास ते बेस्टकडे विशेष बसची मागणी करू शकतात. त्यासंबंधीचे अधिकार हे स्थानिक आगार पातळीवर घेतले जाऊ शकतील, असे उपक्रमाकडून सांगण्यात आले.

कंट्रोल रूममध्ये

अधिक कर्मचारी

मध्य रेल्वेने संचलनामध्ये अडचणी येऊ नयेत, यासाठी कंट्रोल रूममध्ये जादा अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

तांत्रिक अडचण किंवा बिघाड झाल्यास तत्काळ सोडविण्याच्या दृष्टीने हे कर्मचारी तैनात केल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी

डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.

... तर विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा

बोर्डाची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांची शहरातील ८७१ परीक्षा केंद्रांवर आचारसंहिता.

केंद्रावरील आणि भोवतीच्या १०० मीटर परिघात प्रवेशासह, इंटरनेटसेवा, ध्वनिक्षेपकास बंदी.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात भारतीय न्यायसंहियेतील कलम २२३ नुसार कारवाई.

परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात परीक्षेस बसणारे परीक्षार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी किंवा परीक्षा नियंत्रकांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्ती व वाहनाशिवाय अन्य कोणालाही नाही.

केंद्राच्या १०० मीटर परिघात सार्वजनिक एसटीडी-आयएसडी टेलिफोन बुथ, फॅक्स, झेरॉक्स, मोबाइल फोन, लॅपटॉप, ब्ल्युटुथ व इंटरनेट आदी माध्यमे परीक्षेच्या काळात बंद.

Web Title: BEST administration, railways also preparing for exams; 'Show your hand, stop the bus,' appeal to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.