मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई शहर आणि उपनगरांतील समुद्रकिनारे, तसेच पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होते. हे लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमातर्फे आज, मंगळवारी अतिरिक्त बसफेऱ्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी पर्यटकांची गैरसोय टळू शकेल.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया, जुहू, गोराई, मार्वेसह मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जाणाऱ्या पर्यटकांसाठी बेस्ट उपक्रमांतर्फे विविध बसमार्गांवर रात्री एकूण २५ जादा बस सोडण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार ही संख्या वाढविण्यात येईल. प्रवाशांच्या मदतीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई समुद्रकिनारा, चर्चगेट स्थानक (पूर्व) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी वाहतूक अधिकारी, बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
दक्षिण मुंबईत ‘हेरिटेज टूर’- बेस्टतर्फे आज ३१ डिसेंबरला दक्षिण मुंबईतील विविध ऐतिहासिक, तसेच प्रेक्षणीय स्थळांना पर्यटकांना भेट देता यावी म्हणून वातानुकूलित दुमजली विद्युत बसद्वारे ‘हेरिटेज टूर’ चालविण्यात येणार आहेत.- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) – गेट वे ऑफ इंडिया – मंत्रालय – एनसीपीए – नरिमन पॉईंट – विल्सन महाविद्यालय – नटराज हॉटेल – चर्चगेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुतात्मा चौक – रिझर्व बँक – ओल्ड कस्टम हाऊस – म्युझियम या मार्गावरून सकाळी १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत दर ४५ मिनिटांनी विशेष बसगाड्या सोडण्यात येतील. - ‘हेरिटेज टूर’साठी वरच्या मजल्यासाठी प्रत्येकी १५० रुपये आणि खालच्या मजल्यावर प्रत्येकी ७५ रुपये भाडे आकारण्यात येईल.