टेरेसवर चालविले बीएड कॉलेज; कल्याणमधील कॉलेजला दहा लाखांचा दंड : मान्यताही रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:16 IST2025-04-09T12:15:58+5:302025-04-09T12:16:32+5:30

कल्याण येथील इरने इन्स्टिट्यूट एज्युकेशन बीएड महाविद्यालयावर विद्यापीठाने ही कारवाई केली आहे.

BEd college run on terrace Kalyan college fined Rs 10 lakhs Accreditation will also be cancelled | टेरेसवर चालविले बीएड कॉलेज; कल्याणमधील कॉलेजला दहा लाखांचा दंड : मान्यताही रद्द होणार

टेरेसवर चालविले बीएड कॉलेज; कल्याणमधील कॉलेजला दहा लाखांचा दंड : मान्यताही रद्द होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कल्याणमध्ये शाळेच्या टेरेसवर चालविण्यात येणाऱ्या बीएड कॉलेजवर मुंबई विद्यापीठाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कॉलेजला विद्यापीठाने १० लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, त्याची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे. 

कल्याण येथील इरने इन्स्टिट्यूट एज्युकेशन बीएड महाविद्यालयावर विद्यापीठाने ही कारवाई केली आहे. बीएड कॉलेजसाठी स्वतंत्र इमारत आवश्यक आहे. मात्र, हे कॉलेज  शिशू विकास संस्थेच्या माध्यमिक शाळेच्या टेरेसवर चालवले जात होते. बीएड महाविद्यालयाचा अभ्यासक्रम नियमित शिकवला जातो. असे असताना विद्यार्थी कॉलेजमध्ये न येताच त्यांना उत्तीर्ण केले जात होते. याबाबतची तक्रार युवासेनेचे सहसचिव ॲड. संतोष धोत्रे यांनी केली होती. 

काॅलेजचे नाव हटवा
विद्यापीठाने कॉलेजवर कारवाई सुरू केली असून, ४ एप्रिलला पत्र पाठवून १० लाख रुपयांचा दंड एका महिन्यात भरण्यास सांगितले आहे. एका महिन्यात दंडाची रक्कम जमा न केल्यास त्यावर १८ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल, असेही नोटिसीत बजावले आहे. विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेतून हे कॉलेज वगळण्याची कारवाईही विद्यापीठाने सुरू केली असून, संकेतस्थळावरून कॉलेजचे नाव हटविण्याची सूचना संबंधित विभागाला केली आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना नजीकच्या इतर कॉलेजमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. 

कॉलेजांची मान्यता प्रक्रिया राबविण्यापूर्वी दरवर्षी विद्यापीठाची समिती कॉलेजला भेट देते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे कॉलेज सुरू असतानाही त्याला मान्यता कशी मिळाली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विद्यापीठाची समिती दरवर्षी महाविद्यालयाला भेट देऊन त्यातील सोयीसुविधा आणि नियमांचे पालन केले जाते की नाही, याचा अहवाल विद्यापीठाला देते. या समितीने पाहणी केली की नाही? विद्यापीठाला खोटी माहिती दिली होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. 
ॲड. संतोष धोत्रे, सहसचिव, युवासेना

Web Title: BEd college run on terrace Kalyan college fined Rs 10 lakhs Accreditation will also be cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण