खुबसुरत! धारावीचे 'स्लम टुरिझम' १०-१५ कोटींवर; दरवर्षी एक लाख देशी-विदेशी पर्यटकांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:47 IST2025-11-07T13:46:52+5:302025-11-07T13:47:29+5:30
ब्रिटिश पर्यटकाने सुरू केली स्लम टूर

खुबसुरत! धारावीचे 'स्लम टुरिझम' १०-१५ कोटींवर; दरवर्षी एक लाख देशी-विदेशी पर्यटकांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीला दरवर्षी ८० हजार ते एक लाख पर्यटक भेट देत असून, यात बहुतांशी परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. गेल्या २० वर्षांपासून धारावीत सुरू असलेल्या या ‘स्लम टुरिझम’ची वार्षिक उलाढाल सुमारे १० ते १५ कोटी रुपये आहे. येथील सुमारे २० ते २५ लहान-मोठे टूर ऑपरेटर्स त्यांच्या १००-१५० टूर गाइडच्या मदतीने पर्यटकांना धारावीची सफर घडवतात.
धारावीत राहणारे फहीम वोरा म्हणतात, स्लम टुरिझम म्हणजे आम्ही पर्यटकांना गरिबी दाखवितो, असा गैरसमज आहे. वास्तविक आम्ही पर्यटकांना धारावीची ओळख करून देतो. धारावीचा पुनर्विकास तर व्हायलाच हवा. मात्र, धारावीच्या ऐक्याचा, मेहनतीचा आत्मा पुनर्विकासात जपायला हवा. धारावीचे डॉक्युमेंटशन व्हायला हवे. जेणेकरून आधीची व पुनर्विकासनंतरची धारावी यातील भौगोलिक, सामाजिक बदल अधोरेखित करता येईल.
माणसाचे जीवन अनुभवण्याची संधी
लघुउद्योग, छोट्या गळ्यांमधील कारखाने, गजबजलेली बाजारपेठ, दाटीवाटीच्या वस्त्या, अपवाद असलेल्या इमारती, शाळा, बेकरी आणि माणसाचे जीवन अनुभवता येते.
पर्यटकांसाठी नियम असे...
- योग्य पेहराव, परवानगीशिवाय फोटो किंवा व्हिडीओ काढू नये, अशा सूचना पर्यटकांना असतात.
- रहिवाशांच्या भावना दुखावतील, असे दयेचे किंवा अन्य कोणतेही हावभाव चेहऱ्यावर ठेवू नयेत.
- स्थानिकांची प्रायव्हसी जपावी, अशा सूचना गाइडकडून दिल्या जातात.
ब्रिटिश पर्यटकाने सुरू केली स्लम टूर
ब्रिटिश पर्यटक ख्रिस वे आणि दक्षिण भारतीय कृष्णा पुजारी यांनी आफ्रिकेतील फेवेला टूरच्या धर्तीवर धारावीत एज्युकेशनल स्लम टूर सुरू केली. ही केवळ मुंबईतील नव्हे, तर देशभरातील पहिली स्लम टूर ठरली.
लोकांच्या मेहनतीचे मोल
धारावीत राहणारे मोहम्मद सादिकच्या मते धारावी आतून खुबसुरत आहे. खुबसुरती लोकांच्या मेहनतीत आहे. छोट्या-छोट्या उद्योगांमध्ये आहे. पुनर्विकास तर हवाच आहे. पण या उद्योगांना पुनर्विकासात सामावून घेतले तर भविष्यातही पर्यटक येथे येतील. तर, समीर कांबळे म्हणाले, धारावी स्लम टूर ही पर्यटकांसाठी आय ओपनर ठरते. यातून जगण्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. २००५ मध्ये स्लम टुरिझम सुरू करणारे कृष्णा पुजारी म्हणतात, धारावीचा पुनर्विकास योग्य तऱ्हेने झाला तर जगभरात सकारात्मक संदेश जाईल. धारावीचा कायापालट पर्यटकांना दाखविता येईल.