मुंबईत पहिल्यांदाच पालिकेच्यावतीने त्रिमितीय म्युरलचे सौंदर्यीकरण

By मनोहर कुंभेजकर | Published: March 22, 2023 01:27 PM2023-03-22T13:27:54+5:302023-03-22T13:29:23+5:30

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते लोकार्पण

Beautification of three dimensional mural on behalf of the municipality for the first time in Mumbai | मुंबईत पहिल्यांदाच पालिकेच्यावतीने त्रिमितीय म्युरलचे सौंदर्यीकरण

मुंबईत पहिल्यांदाच पालिकेच्यावतीने त्रिमितीय म्युरलचे सौंदर्यीकरण

googlenewsNext

मुंबई : मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून पूर्व उपनगरातील चेंबूरच्या डॉ. सोरेसेस रोड येथे त्रिमितीय म्युरलची निर्मिती करून रस्त्याच्या दुतर्फा सौंदर्यीकरण केलेल्या मुंबईतील पहिल्याच प्रकल्पाचे लोकार्पण लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईच्या सुशोभीकरणाची गुढी उभारून मुंबईकरांना पालिकेच्या वतीने नववर्षाची भेट देण्यात आली आहे. 

मुंबईच्या सुशोभीकरण मोहिमेचा भाग म्हणून पालिकेच्या एम पश्चिम विभागाच्या वतीने चेंबूरच्या डायमंड गार्डन ते गोल्फ कोर्स पर्यंतच्या संपूर्ण डॉ. सोरेसेस रोडचे अनोख्या पद्धतीने सौंदर्यीकरण करण्यात आले. यामुळे चेंबूरच्या डॉ. सोरेसेस रोडला नवा लूक आला आहे.

या प्रकल्पात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भिंतींवर मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे त्रिमितीय पध्दतीने उभारण्यात आली आहेत. यात एशियाटिक लायब्ररी, राजाभाई टॉवर, मुंबई महानगर पालिका मुख्यालय,क्वीन्स नेकलेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत, म्हातारीचा बूट, चेंबूरमधील मेट्रो आणि मोनो जंक्शन यांसह अनेक आयकॉनिक ठिकाणे मुंबईकरांना पाहता येणार आहेत. तसेच पूर्व उपनगरातील एकमेव गोल्फ कोर्सच्या भिंतींवर गोल्फ खेळाडूंच्या मुद्रा देखील अनोख्या पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. इथल्या सर्व वाहतूक बेटांचे देखील सुशोभीकरण करण्यात आले आहे . याच रस्त्यावरील स्वातंत्र्य सैनिक गार्डन ( चिमणी गार्डन) येथे देखील कृत्रिम वृक्ष उभारून पक्ष्यांसाठी अधिवास तयार केला आहे. पालिकेच्या एम पश्चिम प्रभागाच्या वतीने सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या या त्रिमितीय प्रकल्पामुळे चेंबूरच्या सौंदर्यात नक्कीच भर पाडणार असल्याचा विश्वास खासदार शेवाळे यांनी व्यक्त केला.

या लोकार्पण सोहळ्याला खासदार राहुल शेवाळे यांच्यासह माजी नगरसेवक महादेव शिवगण,शिवसेना विभागप्रमुख अविनाश राणे, महिला विभाग संघटिका सुनिता वैती, माजी नगरसेविका राजश्री पालांडे , आरपीआयचे तालुका अध्यक्ष संजय ढोळसे, अनिस पठाण पालिका उपायुक्त  हर्षल काळे, सहाय्यक आयुक्त  विश्वास मोटे, सहाय्यक अभियंता  संतोष निकाळजे आणि अन्य पदाधिकरी व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Beautification of three dimensional mural on behalf of the municipality for the first time in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई