कौवढाळ तलावाचे सुशोभीकरण

By Admin | Updated: May 21, 2014 04:52 IST2014-05-21T04:52:24+5:302014-05-21T04:52:24+5:30

मान्सूनपूर्व आपत्कालीन व्यवस्थापनात सध्या पेण नगर प्रशासन गुंतले आहे.

Beautification of crow pond | कौवढाळ तलावाचे सुशोभीकरण

कौवढाळ तलावाचे सुशोभीकरण

पेण : मान्सूनपूर्व आपत्कालीन व्यवस्थापनात सध्या पेण नगर प्रशासन गुंतले आहे. दररोज शहराचा घनकचरा उचलण्यास सुरुवात झाली आहे. शहराच्या पाच प्रभागातील कचरा संकलन व वितरण व्यवस्थेचे काम हाती घेण्यात आले आहे. मान्सूनपूर्व कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची तयारी वेगाने सुरु आहे. नालेसफाई, शहराच्या बाहेरील भागात पाणी तुंबणार्‍या विभागातील नाले खोदाई या कामांवर सध्या पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. याच बरोबरीने मान्सूनपूर्व रेन हार्वेस्टिंगचा एक भाग म्हणून जलसंधारण व सरोवर संवर्धन व सुभोभीकरणाअंतर्गत शहरातील मुख्य तलाव असलेल्या कौवढाळ व मोतीराम तलावाचे संवर्धन व सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मान्सूनच्या दमदार एंट्रीबरोबर या तलावाच्या सौंदर्यीकरणाकडेही भर देण्यात आला आहे. मान्सूनने अंदमानची हद्द ओलांडून पुढे वाटचाल केली आहे. मान्सूनपूर्व तयारीसाठी आपत्ती यंत्रणा कामाला लागली आहे. मान्सून दाखल होण्यापूर्वीच जी कामे अधिक महत्त्वाची व शहरातील नागरिकांचे आरोग्य, शहर सौंदर्यीकरण, घनकचरा उचलणे, शहरातील तलावातील गाळ उपसा, पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती या कामांची यादी आपत्ती यंत्रणेच्या अजेंड्यावर आहेत. शासन व प्रशासन याकामाची व्याप्ती व परिपूर्णता कशी झाली याचा अहवालही मागविते व याच बरोबरीने शासकीय योजनांची कामे त्यामधील जलसंधारण, तलावांचे संवर्धन, सुशोभीकरण, वृक्ष लागवड या कामांचीही मान्सूनपूर्व कामे म्हणून गणन केली जाते. पेण नगर प्रशासनाने सरोवर संवर्धन व सुशोभीकरण योजनेअंतर्गत पेण शहरातील कौवढाळ व मोतीराम तलावांची कामे अंतिम टप्प्यात असून यावर पालिका प्रशासनाने तब्बल पाच कोटी खर्चाची तरतूद केली आहे. या दोनही तलावांचा गाळ उपसा व तलावाच्या संरक्षण भिंती, तलावाचे संरक्षक कंपाऊंड वॉल ही कामे व सभोवार मातीच्या भराव टाकून रस्त्याची केली जाणारी कामे ही सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. मान्सून यावर्षी ९५ टक्के पडणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केल्याने प्रशासनाच्या सर्व विभागाला रेन हार्वेस्टिंग योजनेवर भर देण्याचे आदेशही पारित झालेत आहेत. ज्या शहरांमध्ये तलावांचे अस्तित्व आहे तिथे तिथे सरोवर संवर्धन व सुशोभीकरण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे शासनाच्या धोरणास प्रथम प्राधान्य देत पेण नगर प्रशासनाने नगराध्यक्ष प्रीतम पाटील व पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे यांच्या मार्गदर्शनाखाली कौवढाळ तलाव व मोतीराम तलावांचे संवर्धन व सुशोभीकरणाची उरकलेली कामे पूर्ण करण्यात येत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Beautification of crow pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.