Join us  

अफवा पसरवणाऱ्यांनो सावध राहा; आता मुंबई पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 9:00 PM

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक ग्रुपमध्ये पोलीस होणार सामील

मुंबई - धुळ्यात सोशल मीडियावरून पेव पडलेल्या अफवांमुळे पाच जणांचा जीव गेला. त्यामुळे समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मुंबई पोलिसांनी अनोखी व्यूहरचना आखली आहे. प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचे जास्तीत जास्त खासगी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभाग असेल. या ग्रुपमध्ये दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी, खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती आली तर ती अन्य ग्रुपमध्ये जाण्यापासून रोखेल, अशी माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांनी दिली आहे. .

मूल चोरणारी टोळी या अफवेवरून धुळ्यात पाच जणांची हत्या केली गेली. या प्रसंगाची पुनरावृत्ती मालेगावमध्ये होता होता राहिली.अशा प्रकारच्या आणखी निर्माण होणाऱ्या अफवांना रोखण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना केल्या जात आहेत. या अफवा, जनतेची दिशाभूल करणारी माहिती, समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर  महापुरुषांची बदनामी करणारा किंवा देवदेवतांचा अपमान करणारा असा मजकूर तसेच फोटो,फेसबूक, ट्विटर या माध्यमांवरून काढून टाकणे शक्य आहे. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपवरून दोन व्यक्तींमध्ये किंवा समूहात होणारा संवाद रोखणे, मध्यस्थी करणे पोलिसांच्या हाती नाही. त्यामुळे सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक ग्रुपवर पोलिस करडी नजर ठेवणार आहे. 

पोलिसांचे खासगी व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक ग्रुपमध्ये सहभाग असल्यास एका समूहामधून अन्य समूहांमध्ये वाऱ्यासारख्या पसरणाऱ्या अफवा तिथल्या तिथे रोखणे शक्य होईल. ग्रुप मेम्बर असलेला पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी ही अफवा आहे, हा महापुरुषाची बदनामी करणारा, दोन समाजात तेढ निर्माण करणारा मेसेज आहे, तो पसरवू नका, पसरवल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशा सूचना देऊ शकेल. तसेच नेमकी माहिती घेऊन हा संदेश अफवा आहे, हे ग्रुपमधील अन्य सदस्यांना देऊ शकेल. त्यामुळे अफवेचा पेव पुढे पसरवण्यास आपोआप चाप बसेल. तसेच मुंबईसह राज्यातील सायबर पोलिसांनी नागरिकांच्या कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :मुंबईपोलिससोशल मीडिया