जपून जपून जा रे... पुढे धोका आहे, लोकलच्या मार्गावर काही ठिकाणी धोकादायक वळणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:06 IST2025-06-11T13:06:02+5:302025-06-11T13:06:24+5:30
Mumbai Suburban Railway: मुंब्रा येथील रेल्वे दुर्घटनेनंतर रुळांमधील अंतरासह रेल्वे रुळांच्या वळणाचा विषय प्रामुख्याने चर्चेला आला आहे. पारसिक बोगद्यापासून दिवा, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद बंदर येथील दोन रुळांमधील अंतर आणि वळण वेगाने धावणाऱ्या लोकलमधील प्रवाशांसाठी जीवघेणे ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जपून जपून जा रे... पुढे धोका आहे, लोकलच्या मार्गावर काही ठिकाणी धोकादायक वळणे
मुंबई - मुंब्रा येथील रेल्वे दुर्घटनेनंतर रुळांमधील अंतरासह रेल्वे रुळांच्या वळणाचा विषय प्रामुख्याने चर्चेला आला आहे. पारसिक बोगद्यापासून दिवा, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद बंदर येथील दोन रुळांमधील अंतर आणि वळण वेगाने धावणाऱ्या लोकलमधील प्रवाशांसाठी जीवघेणे ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषत: रुळांमधील कमी अंतरामुळे काही ठिकाणी दोन लोकल अगदी जवळून धावतात. गर्दीमुळे नाइलाजास्तव लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या ते जीवावर बेतते.
रोज सकाळी ७:०० ते दुपारी १२:०० या वेळेत खोपोली - कर्जत - कसाराहून सीएसएमटीकडे आणि सायंकाळी ५:०० ते १०:०० या वेळेत त्याच दिशेने उलटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लोकल भरभरून वाहात असतात. पीक अवरला तर दरवाजावरही उभे राहायला जागा नसते. हे माहिती असूनही रेल्वे प्रशासन यावर काहीही करायला तयार नाही. त्यामुळेही प्रवासी संतप्त हाेत आहेत.
कुठे ठरू शकतो धोका?
मध्य रेल्वेच्या या संपूर्ण मार्गावर मस्जिद बंदर रेल्वे स्थानकातून सीएसएमटीकडे जाणाऱ्या - येणाऱ्या लोकल नेमक्या मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळच्या वळणावर एकमेकांच्या अगदीच जवळून जातात.
मस्जिद बंदर आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळही अशीच परिस्थिती असते. विद्याविहार सोडल्यानंतर घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या- येणाऱ्या वळणावर लोकल किंचित झुकल्याचे दिसते.
मुंब्रा सोडले की, दिवाच्या दिशेने अप व डाऊन मार्गावर लोकलचे डबे एका बाजूला झुकतात. शिवाय मुंब्रा स्टेशनच्या दोन्ही बाजूला अप - डाऊन मार्गावर वळण आहे.
कळवा स्टेशनच्या पुढे पारसिक बोगद्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या वळणामुळे प्रवाशांना धडकी भरते. मध्य रेल्वेवर ठिकठिकाणी असलेल्या या वळणामुळे दोन लोकलमधील प्रवासी अगदी हाताच्या अंतरावर एकमेकांपासून दूर असल्याचे मुंबईकरांना पदोपदी जाणवत असते.
सीएसएमटीकडे सकाळी जाणाऱ्या लोकलमध्ये ठाणे, घाटकोपरसह कुर्ला रेल्वे स्थानकांवर प्रवेशही करता येत नाही. रात्री हा प्रवास उलट दिशेने सुरू असतानाही परिस्थिती सारखीच असते.