काळजी घ्या मुंबईकरांनो, स्वस्त घर पडते महागात! आरोपीने तक्रारदाराकडून घेतले १४ लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 14:19 IST2025-03-24T14:18:56+5:302025-03-24T14:19:20+5:30

असे व्यवहार करताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे

Be careful Mumbaikars, cheap house becomes expensive! Accused took Rs 14 lakh from complainant | काळजी घ्या मुंबईकरांनो, स्वस्त घर पडते महागात! आरोपीने तक्रारदाराकडून घेतले १४ लाख रुपये

काळजी घ्या मुंबईकरांनो, स्वस्त घर पडते महागात! आरोपीने तक्रारदाराकडून घेतले १४ लाख रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईत हक्काचे घर असावे, म्हणून अनेकांची धडपड सुरू असते. अशा घराच्या शोधात असलेल्या नागरिकांना म्हाडा, एमएमआरडीए, एसआरएमध्ये स्वस्तात घर मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे असे व्यवहार करताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दादरमधील काकासाहेब गाडगीळ मार्ग परिसरात राहणाऱ्या ५५ वर्षीय विमा एजंटने अशीच एक तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्यांची विक्रोळीतील रहिवासी विष्णू चिंचावडेकर नावाच्या व्यक्तीशी चांगली मैत्री होती. चिंचावडेकर हा म्हाडाची घरे स्वस्तात मिळवून देत असल्याचे समजले असता, तक्रारदाराने अन्य दोघांसोबत चिंचावडेकरची भेट घेतली. त्याने आपण म्हाडामध्ये कामाला असून, २२५ चौरस फुटांचे घर ३० लाखांत मिळवून देतो, असे सांगितले. यासाठी १५ लाखांची मागणी करत चिंचावडेकरने दादरमधील भवानी शंकर रोडवर असलेल्या इमारतीमधील फ्लॅट दाखवला. फ्लॅट आवडल्याने तक्रारदाराने चिंचावडेकरला १४ लाख रुपये पोच केले. पण अखेरपर्यंत म्हाडाचे घर मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दादर पोलिसांत धाव घेतली.

नेत्यांच्या नावानेही चुना

राजकीय नेत्यांच्या नावाचा वापर करतही फसवणुक करण्याच्या घटना डोके वर काढत आहेत. यामध्ये काही नेत्यांचे ‘पीए’देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे.
त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडण्यापूर्वी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. 

यापूर्वीच्या घटना

  • एमएमआरडीएमध्ये स्वस्तात घर मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ठगाला शिवडी पोलिसांंनी बेड्या ठोकल्या आहेत. 
  • विजय मारुती कांबळे (३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, सर्व सामान्यांसह पोलिसालाही त्याने पावणे अठरा लाखांना गंडविले आहे.
  • सफाई कामगार असलेला आरोपी  पालिकेत मुकादम असल्याचे भासवून फसवणूक करत होता.

Web Title: Be careful Mumbaikars, cheap house becomes expensive! Accused took Rs 14 lakh from complainant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई