Join us
Daily Top 2Weekly Top 5

बीडीडी पुनर्विकास : सर्व्हेनंतर तातडीने हाती घेण्यात आले पात्रता निश्चित करण्याचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 17:41 IST

रहिवाशांचा सर्व्हे करण्यात आला

 

मुंबई : वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील पहिल्या टप्प्यातील काही राहिलेल्या रहिवाशांचा सर्व्हे करण्यात आला असून त्यांची पात्रता निश्चित करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रकल्पाच्या बाबतीत योग्य सुचना देण्यात आल्या आहेत.बीडीडी पुनर्विकासाच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात वर्षा  निवासस्थानी घेतलेल्या आढावा बैठकीत बीडीडी पुनर्विकासाच्या रखडलेल्या कामाबद्दल नापसंती व्यक्त केली होती. याबाबतीत वेळकाढूपणा खपवून घेतला जाणार नाही. पुनर्विकासातील अडथळे दूर करून लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी, असा आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिला होता. या बैठकीनंतर गृहनिर्माण मंत्रालय सक्रीय झाले असून म्हाडा प्रशासन आणि उपजिल्हाधिकारी यांना विशिष्ट कालमर्यादेत काम पूर्ण करा, असे स्पष्टपणे निर्देश गृहनिर्माण सचिवांनी दिले आहेत.सरकारच्या या सक्रिय कारभारामुळे आता प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा ना.म.जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी व्यक्त केली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास हा महाराष्ट्र शासनाचा अती महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो लवकर पूर्ण व्हावा. आणि भाडेकरूंचे मोठया घराच स्वप्न साकार व्हावे या हेतूने आम्ही शासनाला सर्वतोपरी सहकार्य करीत आहे, असेही नलगे यांनी सांगितले.  वरळी येथे बीडीडी चाळीत ९ हजार ६०० भाडेकरू असून त्यांची आवश्यक ती पात्रता आणि कागदपत्रे तपासण्यासाठी तातडीने त्या ठिकाणी विशेष शिबीर आयोजित करून विशिष्ट कालमर्यादेत हे काम पूर्ण झाले पाहिजे. ना. म. जोशी मार्ग येथे ३२ चाळी असून २५०० भाडेकरू आहेत. तर नायगाव येथे ४२ चाळी आणि ३३०० भाडेकरू आहेत. तेथील पुनर्विकास प्रक्रियेतील समस्या तातडीने दूर करून विकासास सुरुवात करावी. तसेच भाडेकरूंचे योग्य स्थलांतर करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :बांधकाम उद्योगम्हाडामुंबईराज्य सरकार