ठाकरे जिंकले, ठाकरे हरले; भाजपने मैदान मारले !

By अतुल कुलकर्णी | Updated: January 19, 2026 06:57 IST2026-01-19T06:57:10+5:302026-01-19T06:57:28+5:30

ज्या पद्धतीने उद्धव आणि आदित्य दोघांनी मुंबईत प्रचार केला त्याचा त्यांना फायदा झाला

Battle for MumbaiBJP Emerges Victorious as Thackeray Brand Shows Resilience | ठाकरे जिंकले, ठाकरे हरले; भाजपने मैदान मारले !

ठाकरे जिंकले, ठाकरे हरले; भाजपने मैदान मारले !

अतुल कुलकर्णी

राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. मात्र, मुंबईत काय होणार हा एकमेव प्रश्न उभ्या महाराष्ट्राला होता. याचे एका वाक्यात उत्तर द्यायचे झाले तर ठाकरे जिंकले, ठाकरे हरले आणि भाजपने मैदान मारले असे म्हणता येईल. दोन ठाकरे एकत्र आले हा भावनिक मुद्दा आणि भाजप नेत्यांनी नियोजनबद्ध रीतीने आखलेली रणनीती याचा हा निकाल आहे. भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, मनसे आणि काँग्रेस असा वेगवेगळा विचार केला तर हा निकाल समजायला सोपा जातो. अशा निवडणुका होण्याआधी काय काय घडले? काय बिघडले? आणि लोकांना त्यातील कोणत्या गोष्टी आवडल्या किंवा आवडल्या नाहीत? हे देखील निकालातून समोर येते.

२०१७ मध्ये उद्धवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. त्यात मनसेच्या ६ जणांनी प्रवेश केला. त्यामुळे उद्धवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ९० वर गेली होती. तेवढ्या जागा एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत वाटाघाटी करून मुंबईत मिळविल्या. या जागा मिळवताना उद्धवसेनेमधून शिंदेसेनेत आलेल्या ५४ नगरसेवकांपैकी २१ जणांना शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी दिली. त्यातले फक्त ९ विजयी झाले. ज्या १२ माजी नगरसेवकांच्या नातेवाइकांना उमेदवारी दिली त्यातील तिघे पराभूत झाले. अन्य पक्षांतून शिंदेसेनेत आलेल्या ६ जणांना उमेदवारी दिली. त्यात २ विजयी व ४ पराभूत झाले. तसेच अन्य पक्षांतून शिंदेसेनेत आलेल्या २ माजी नगरसेवकांच्या नातेवाइकांना उमेदवारी दिली होती. त्यात १ विजयी १ पराभूत झाला. याचा अर्थ ९० जागा ज्यांच्या भरवशावर घेण्यात आल्या त्यातील फक्त २९ निवडून आले. जे लोक उद्धवसेनेमधून शिंदेसेनेत गेले होते त्यातल्या अनेकांना लोकांनी नाकारले. शिवाय शिंदेसेनेतील ज्या नेत्यांनी स्वतःच्या नातेवाइकांसाठी तिकिटे मागून घेतली त्यांनाही लोकांनी घरी बसविले. प्रत्येक मतदारसंघाची वेगवेगळी कारणे असू शकतात. पक्ष फोडाफोडी, पैशांचे मोठे व्यवहार, त्यातून होणारी चर्चा मतदारांपासून लपून राहत नाही. ती निकालातून दिसली.

उद्धव आणि राज ठाकरे दोघे एकत्र आले. उद्धवसेनेने १६३, तर मनसेने ५२ जागा लढवल्या. उद्धव ठाकरे यांनी ६० जुन्या चेहऱ्यांना संधी देताना जवळपास १०० नवे चेहरे पहिल्यांदा रिंगणात उतरवले. मात्र, जुन्या ६० पैकी विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, मिलिंद वैद्य, सुहास वाडकर हे पाच वगळता बाकी सगळेच्या सगळे पराभूत झाले. उद्धवसेनेचे ६५ उमेदवार निवडून आले त्यातील ६० चेहरे नवे आहेत. बाळासाहेबांनी कोणालाही उभे केले तर तो निवडून येतो असे सांगितले जायचे. त्याचे प्रत्यंतर या निकालातून पुन्हा एकदा आले. ज्या पद्धतीने उद्धव आणि आदित्य दोघांनी मुंबईत प्रचार केला त्याचा त्यांना फायदा झाला. मात्र, असा प्रचार त्यांनी कल्याण डोंबिवली, ठाणे किंवा एमएमआर रिजनमध्ये केला नाही. स्वाभाविक तिथे त्यांना काहीही यश मिळाले नाही. या सगळ्यात राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवरची सभा निर्णायक ठरली. त्यांच्या इंजिनमध्ये त्यांनी भरलेल्या कोळशाने पेट घेतला खरा. मात्र, त्यातून मशाल प्रज्वलित झाली. इंजिन काही धावू शकले नाही. मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत, असे दोघांनी जाहीर केले. तेव्हापासून त्यांनी राजकीय भूमिका घ्यायला हवी होती.
काँग्रेसने १५१ उमेदवार उभे केले. मात्र, त्यात कसले नियोजन नव्हते. धोरण नव्हते. मुंबईत आजवर ज्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले त्यांना विश्वासात घेतले नव्हते. काँग्रेसचे जे २४ नगरसेवक निवडून आले त्या प्रभागात काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत. ज्या पद्धतीने काँग्रेस विधानसभेनंतर मुंबईत वागत आली त्याच पद्धतीने पुढे वागत राहिली आणि मुंबई काँग्रेसमध्ये बदल झाले नाहीत, तर यापेक्षाही वाईट अवस्था दूर नाही.

भाजपने १३५ उमेदवार उभे केले. त्यातील चार उमेदवार निवडणुकीआधीच बाद झाले होते. मात्र, कमी उमेदवार उभे करूनही जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपने आखलेली रणनीती त्यांच्या कामी आली. देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचे मुद्दे मांडायचे. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी हिंदुत्व आणि मुस्लिम महापौर होणार का? असे मुद्दे उपस्थित करायचे, तर तिसरीकडे आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना अंगावर घ्यायचे, अशी रणनीती त्यांनी आखली. या तिहेरी हल्ल्याला उद्धव, राज यांच्याकडून म्हणावे तसे प्रभावी उत्तर शेवटपर्यंत दिले गेले नाही. मुंबई अध्यक्ष म्हणून साटम यांची ही पहिलीच निवडणूक होती. २५ वर्षांत भाजपला मुंबईत स्वतःचा महापौर बनवणे शक्य झाले नव्हते ते साटम यांच्या कारकिर्दीत शक्य झाले. शिवाय त्यांच्या अंधेरी पश्चिममधून त्यांनी सहा नगरसेवक निवडून आणले. ही त्यांची जमेची बाजू आहे. बोरिवलीचे आ. संजय उपाध्याय यांनी नात्यागोत्यात तिकिटे द्यायची नाहीत, अशी ठाम भूमिका घेत बोरिवलीमधून भाजपचे ६ आणि शिंदेसेनेचा १ असे सातही नगरसेवक निवडून आणले. या भूमिकेमुळे त्यांना पक्षांतर्गतही नाराजीचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी तो सहन केला. चारकोपमधून आ. योगेश सागर आणि दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी यांनीदेखील सर्वच्या सर्व नगरसेवक निवडून आणले.

आता दोन्ही ठाकरेंना पुन्हा मैदानात उतरावे लागेल. नव्याने संघटनेची आणि पक्षाची बांधणी करावी लागेल. भाजपला किंवा शिंदेसेनेला आणि ठाकरे बंधूंना मिळालेले यश व त्यांची प्राप्त परिस्थिती यांची तुलना ज्याची त्यांनी करून बघावी. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. 

Web Title : ठाकरे जीते, हारे; मुंबई नगर निगम चुनाव में भाजपा की जीत!

Web Summary : मुंबई में मिले-जुले नतीजे आए: ठाकरे जीते भी और हारे भी, जबकि भाजपा ने रणनीतिक रूप से जीत हासिल की। आंतरिक संघर्षों और उम्मीदवार चयन ने अन्य दलों को प्रभावित किया।

Web Title : Thackerays Won, Lost; BJP Victorious in Mumbai Municipal Elections!

Web Summary : Mumbai saw mixed results: Thackerays both won and lost seats, while BJP strategically secured victory. Internal conflicts and candidate selection impacted other parties.