Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा, यंदाही रेल्वे मिनिटातच फुल्ल, आम्ही कोकणात जाऊचा कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 09:56 IST

गणेशोत्सवातील दिवसांची वेटिंग लिस्टही हजार पार : चौकशीची प्रवासी संघटनांची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरू होताच अवघ्या एका मिनिटात त्या फुल झाल्या आहेत, तर या गाड्यांची वेटिंग लिस्ट १ हजार ४२ च्या पुढे जाऊन ठेपली आहे. त्यामुळे दलालांमार्फत होत असलेल्या या तिकीट आरक्षणांना आळा घालण्यासाठी याची चौकशी करावी, अशी मागणी सर्वच रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे. रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल झाल्याने आम्ही गणेशोत्सवासाठी गावी जायचे कसे, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

रेल्वेकडून १२० दिवस अगोदर गाड्यांचे आरक्षण सुरू होते. त्यानुसार यावर्षी गणेशोत्सवासाठी ४ मे रोजी १ सप्टेंबरचे तिकीट बुकिंग सुरू झाले. काही मिनिटांत रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल झाले व वेटिंग लिस्ट एक हजार ४२ च्या पुढे जाऊन ठेपल्याचे रेल्वे प्रवासी संघटनांनी सांगितले. नियमित गाड्यांचे बुकिंग फुल झाल्यानंतर गणपतीच्या एक ते दीड महिनाआधी मध्य व पश्चिम रेल्वेवरून मोठ्या प्रमाणात गणपती स्पेशल रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहेत. सीएसएमटी, दादर, ठाणे, दिवा, कल्याण, पनवेल, पुणे, मुंबई सेंट्रल, वांद्रे, अहमदाबाद येथून मोठ्या प्रमाणात गाड्या कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे सोडण्याच्या तयारीत रेल्वे प्रशासन आहे.

आरक्षणासाठी नाना विघ्न     कोकणकन्या एक्स्प्रेसचे आरक्षण मंगळवारी सुरू झाल्यानंतर अवघ्या एका मिनिटांत वेटिंग लिस्ट ५०० वर गेली. या आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.    रेल्वे गाड्यांचे आरक्षण करताना बहुतेक गाड्यांची आरक्षण क्षमता संपल्याचे निदर्शनास येत होते. प्रत्येक गाडीची वेटिंग लिस्ट  ‘रिग्रेट’ दाखविली जात होती.    जनशताब्दी, कोचुवेली, मंगला लक्षद्वीप, नेत्रावती, श्री गंगानगर-कोचुवेली, तुतारी, मांडवी या एक्स्प्रेसचे तिकीट आरक्षित करताना प्रवाशांना अडचणी आल्या.

 अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने रेल्वे वेटिंग लिस्टची मर्यादी नेमकी किती आहे, असा सवाल समाजमाध्यमांवर करीत १ हजार ४२ वेटिंग तिकीट पोस्ट केले आहे. मुंबई रेल प्रवासी संघानेही या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी समाजमाध्यमांद्वारे केली आहे.

गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या दोनशे ते सव्वादोनशे फेऱ्या सोडल्या जातात. मंगळवारी याचे आरक्षण सुरू झाले होते. मात्र, काही सेकंदांतच साडेचारशे ते साडेपाचशे वेटिंग आले. दलालांमुळे या अडचणी येत आहेत. दलालांचाही कोटा असतो. मात्र, किमान गणेशोत्सवापुरते तरी यास आळा बसला पाहिजे. कारण नंतर ही तिकिटे दामदुप्पट रकमेने विकली जातात. त्याचा फटका कोकण रेल्वे प्रवाशांना बसतो.    - राजू कांबळे, प्रमुख, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ.

टॅग्स :भारतीय रेल्वेगणेशोत्सव